गुलाम दस्तगीर बिराजदार

संजीवनी धुरी-जाधव, [email protected]

एक मुस्लिम शिक्षक संस्कृत वेदपारंगत. कुराण संस्कृतमध्ये अनुवादित करून त्याच्या प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहे. संस्कृतचा प्रसार आणि प्रचार हे त्यांचे पुढचे उद्दिष्ट आहे.

क्यावर सोलापुरी टोपी, अंगात पांढऱया रंगाचा झब्बा-पायजमा असा त्यांचा मराठमोळा पोशाख. वयाने थकलेले असले तरी बोलण्यात गोडवा आहे. मुस्लिम असले तरी संस्कृत भाषेचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. संस्कृत भाषेचा प्रसार व्हावा आणि त्यांचा पवित्र धर्मग्रंथ ‘कुराण शरीफ’ संस्कृतमध्ये असावा यासाठी त्यांनी तो संस्कृतमध्ये अनुवादित केला. ही व्यक्ती म्हणजे ८२ वर्षांचे संस्कृत पंडित आणि वेदांचे गाढे अभ्यासक पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार.

गुलाम दस्तगीर हे वरळीच्या हजरत जंगली पीर दर्ग्याजवळच छोटय़ाशा खोलीत पत्नीसोबत राहतात. घरात शिरताच समोर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे ग्रंथ दिसतात. गुलाम दस्तगीर यांचा जन्म सोलापूर येथील चिक्केहल्ली या गावातला… त्यांना ‘कुराण शरीफ’ संस्कृतमध्ये का लिहिले असे विचारले असता ते म्हणाले, कुराण संस्कृत सोडून सगळ्या भाषेत आहे. त्यामुळे तो संस्कृत भाषेतही यावा असे त्यांना वाटत होते. त्याचबरोबर आपल्याकडून संस्कृत भाषेचा प्रसार व्हावा असेही वाटत होते. दरम्यान, डॉ. सत्यदेव वर्मा यांनी संस्कृतमध्ये कुराणाचा अनुवाद केला होता. त्यामुळे त्यांनी त्याबाबत विचार केला नाही, पण २०१५ मध्ये एका परिषदेत ते गेले असताना त्यांना काही मौलाना भेटले आणि  कुराणातले काही शब्द आहेत तसेच ठेवून ‘कुराण शरीफ’ संस्कृतमध्ये लिहिण्याचा आग्रह केला. त्यांच्या विनंतीला मान देऊन बिराजदार यांनी ‘कुराण शरीफ’ अभ्यासपूर्ण संस्कृतमध्ये लिहिले. कोणत्याही भाषेत धार्मिक शब्द आहेत. ते बदलू शकत नाहीत असेही ते सांगतात.

बिराजदार यांचा संस्कृत भाषेचा अभ्यास असला तरी उर्दू भाषेचा फारसा अभ्यास नसल्याचे ते सांगतात. संस्कृत भाषेबद्दल मात्र ते भरभरून बोलतात. त्यांच्या मते संस्कृत भाषा म्हणजे एक संस्कार आहेत. संस्कृतची शब्दसंपत्ती समर्थ आहे. त्याला वेगळा पर्याय नाही. संस्कृत भाषेच्या शब्दांची ताकद अन्य भाषेत नाही असेही ते मानतात. ‘कुराण शरीफ’ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमध्ये अनुवादित करायचा ही खूप मोठी जबाबदारी होती. त्याचे शब्द संयोजन करायला वेळ लागला. शब्दकोशातून अर्थ आणि संदर्भ शोधण्यात त्यांचा बराच वेळ गेला. केवळ समान अर्थाचा शब्द देण्यापेक्षा तो शब्द कोणत्या अर्थाने वापरू शकू याचा संदर्भही ते बघत होते.

पुढे ते म्हणाले, कुराण आणि वेद समान आहेत. गूढ अर्थ कुराणात स्पष्ट केले आहेत. नमाज करण्याची पद्धत गीतेच्या सहाव्या अध्यायातदेखील आहे. कुराणात ‘नमाज’ हा शब्द नसून ‘सलात’ हा शब्द आहे. कुराणाला पस्तीस नावे आहेत, पण ‘कुराण’  शब्द लक्षात आहे तो संस्कृत भाषेतलाच. आज अनेक शब्द असे आहेत, ज्यांचे अर्थ लागलेले नाहीत. त्यांच्या गुणधर्मातून अर्थ लावण्यात आले आहेत. त्यांना दिशा दिली आहे. शब्दांची उत्पत्ती दिली आहे. त्यामुळे देवनागरी लिपी ही परिपूर्ण आहे.

पुढे ते सांगतात की, फाळणी झाली आणि आम्ही हिंदुस्थानच्या हद्दीत आलो. तेव्हा फार लहान होतो. वडिलांसोबत हमालीचे काम करायचो. ते करत असताना जवळच एक संस्कृत पाठशाळा घेतली जायची. दररोज रात्री तिथे जायचो, असे ते म्हणाले. तिथे विठ्ठलकृष्ण दीक्षित यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले, पण नोकरी चांगली हवी असेल तर शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी मग औपचारिक म्हणून ते शाळेत गेले आणि कीर्तनसम्राट अयाचित शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली धडे घेतले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही शिकत असल्याने खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे लक्ष देण्यात आले. त्यातून त्यांची आवड निर्माण झाली. सुदैवाने त्यांना चांगले गुरू भेटले म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो असेही ते सांगतात.

संस्कृत भाषेतील ‘कुराण शरीफ’ लवकरच येणार आहे. ६०० पानांचे हस्तलिखित दस्तऐवज तयार आहे. सोलापूर येथील शिवप्रज्ञा प्रकाशनाचे राजेंद्र भोसले यांनी या पवित्र कामाच्या छपाईची जबाबदारी उचलली आहे, असेही ते सांगतात.

इंग्रजाळलेल्या वातावरणात संस्कृतच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संस्कृतचे प्रमाणपत्र असले तरी त्याचा नोकरी मिळताना काही वेगळा फायदा होतो असे काही नाही. त्यामुळे संस्कृत शिकण्याची आवड असली तरी फार मोजके लोक त्याकडे वळले आहेत.