कुरुळ हत्याकांडातील फरार आरोपी दीड महिन्यानंतर जेरबंद; 27 मेपर्यत पोलीस कोठडी

58

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अलिबाग तालुक्यातील कुरुळ गावातील रसायनी टेकडीवर दोन भावांच्या भांडणात तिसऱ्याचाच जीव गेल्याची घटना दीड महिनाभरापूर्वी घडली होती. या प्रकरणात एकाला पोलिसांनी अटक केली होती, तर दोनजण फरार होते. त्या फरार दोन आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा व अलिबाग पोलिसांना यश आले आहे. राजेंद्र प्रकाश मगर व समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण या दोघांना कर्नाटकातील गाणगापूरमधून पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने 27 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कुरुळ येथे राहणारे जितेंद्र मगर व राजेंद्र मगर या दोन सख्या भावाचे वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद होते. राजेंद्र मगर यांनी भाऊ जितेंद्र मगर याला मारण्यासाठी निलेश दशरथ वाघमारे (रा.गोविंद बंदर,अलिबाग) आणि समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण (रा.हवेली, पुणे) या दोघांना आपल्या कटात सामील करून घेतले. 1 एप्रिल 2019 रोजी रात्री ते दोघे कुरुळ दत्तटेकडीच्या पायथ्याशी जितेंद्र मगर याला मारण्यासाठी दबा धरून बसले होते. त्यावेळी बाईकवरून येणाऱ्या सागर दत्तात्रय पाटील (रा.कुरूळ, ता.अलिबाग) यांनाच जितेंद्र समजून त्यांनी मारले तसेच गौरव चंद्रकांत भगत यांना जखमी केले होते. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी निलेश वाघमारेला पकडण्यात तात्काळ यश आले होते. मात्र, राजेंद्र मगर आणि समीर फरारी झाले होते. त्यांचा पुणे, मुंबई, कोल्हापुर येथे शोध घेतला. मात्र, ते सापडत नव्हते. ते वेगवेगळया राज्यांत वेषांतर करून फिरत असल्याने त्यांचा माग लागत नव्हता. स्थानिक गुन्हे शाखा व अलिबाग पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र मगर व समीर चव्हाण यांना कर्नाटकातील गाणगापूरमधून अटक करण्यात आली. या दोघांना अलिबाग न्यायालयात हजर केले असता 27 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या