गोपूजक मोदींपासून हिंदुस्थानला मुक्त करणार! मुसाची धमकी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गोपूजा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदूंपासून हिंदुस्थानला मुक्त करणार, अशी धमकी अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी जाकीर मुसा याने दिली आहे. बकरी ईदच्या आधी त्याने १५ मिनिटांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात त्याने हिंदुस्थानविरोधात गरळ ओकली आहे.

मुसा अल कायदाच्या गजवा-ए-हिंद कश्मीर सेलचा म्होरक्या आहे. युट्यूबच्या अंसार गजवा वाहिनीवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. गायींची पूजा करणारे मोदी जनतेला एकत्र करू शकतात. पण आम्हाला रोखू शकत नाहीत. कश्मीरमध्ये मुजाहिदीनना जिहाद करण्यापासून रोखण्यासाठी पाकिस्तानने हिंदुस्थानशी हातमिळवणी केली आहे. हे कृत्य म्हणजे जिहाद-ए- कश्मीरच्या पाठीत खंजीर खुपसणे आहे. कश्मीर जिहादसाठी पाकिस्तानची गरज नसल्याचेही मुसाने या व्हिडिओत म्हटले आहे. मुजाहिदीन स्वत:च्या रक्ताने जिहाद जिवंत ठेवणार असून आम्ही हिंदुस्थानवर इस्लामचा झेंडा फडकावणारच असेही त्याने म्हटले आहे. जम्मूतील रोहिंगो मुस्लिमांवरुनही मुसाने हिंदुस्थानला धमकावले आहे.