राजापूर आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव, वैद्यकीय अधिकारी नाही


सामना ऑनलाईन । येवला

राजापूर येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन होऊन दोन महिने उलटले तरीही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारीच नाही. त्यात सोयीसुविधांचा अभाव… एकतर चांगली आरोग्य सेवा तरी द्या नाहीतर आरोग्य केंद्राला कायमचे टाळे तरी ठोका असा नाराजीचा सूर ग्रामस्थांमधून येत आहे.

राजापूर येथे आरोग्य केंद्राची इमारत लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आली आहे, मात्र या ठिकाणी अनेक सुविधांचा अभाव आहे. पिण्यासाठी पाणी नाही, रुग्णांना सुविधा मिळत नाही. एवढी छान इमारत ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती येथील आरोग्य केंद्राची झाली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा राजापूर, सोमठाणजोश पन्हाळसाठे, ममदापूर, खरवंडी, देवदरी व परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे. उद्घाटन करून दोन महिने झाले तरी दवाखान्याला कर्मचारी मिळत नसल्यामुळे राजापूर व परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या थंडी जास्त प्रमाणात असल्याने रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात दिवसा खासगी डॉक्टर असतात, परंतु रात्रीच्या वेळी डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. रुग्णांना रात्रीच्या वेळी थेट येवला येथे जावे लागते. सध्या राजापूर व परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी व मजुरांना कामे नाही. त्यात घरातील व्यक्ती आजारी पडल्यावर दवाखान्याला पैसे नाहीत. त्यामुळे अनेक गरीब रुग्ण दवाखान्यात न जाता घरीच अंगावर दुखणे काढतात अशी वेळ गरीब शेतकरी व मंजुरांची झाली आहे. त्यामुळे राजापूर येथील आरोग्य केंद्राला कर्मचारी व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी शंकरराव अलगट, समाधान चव्हाण, अशोक आव्हाड, बबन अलगट, भारत वाघ, लक्ष्मण घुगे, शंकर मगर, अनिल अलगट, भाऊसाहेब बैरागी, राजेंद्र वाघ, गोकुळ वाघ, सागर अलगट, संजय कासार आदी ग्रामस्थांनी केली आहे.