दुष्काळाच्या उपाययोजनेला निधी टंचाईचे ग्रहण, सहा कोटीचा आवश्यक निधी अप्राप्त

61

सामना प्रतिनिधी, हिंगोली

जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक असलेला 6 कोटी 18 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला अद्यापही प्राप्त झाला नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दुष्काळाच्या उपाययोजनेला निधी टंचाईचे ग्रहण लागल्यामुळे काही उपाययोजना अद्यापही पुर्ण झाल्या नसल्याची माहिती पुढे आली आहे. गत पाच वर्षांत पहिल्यांदाच टँकरच्या पाणी पुरवठ्याने सत्तरी ओलांडली आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये मागिल वर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे जलस्त्रोत आटले असुन मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात भीषण पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागले. जुन महिन्याच्या पंधरवाड्यापर्यंत देखील हिंगोली शहरासह जिल्हाभरात अपेक्षित असलेला मोठा पाऊस झाला नाही. जिल्ह्याच्या काही भागात वादळ-वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला तरीही या पावसाच्या पाण्याचा साठवणुकीसाठी उपयोग झाला नाही. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातुन पंचायत समित्यांकडुन आलेल्या अहवालाच्या आधारावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाई उपाययोजनें संदर्भातील प्रस्ताव दिले जातात. या प्रस्तावांचे सर्वेक्षण व छानणी झाल्यावर योग्य उपाययोजनांची संख्या निश्चित करुन त्यापैकी काहींना मंजुरी बहाल केली जाते. सर्वसाधारणपणे या टंचाई उपाययोजनेत नवीन विंधन विहीरींचे खोदकाम करणे, नळयोजनेची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजना घेणे, पुरक नळ योजना घेणे, टँकरव्दारे पाणी पुरवठा करणे आदी बाबींचा समावेश असतो.

2018-19 या वर्षाच्या पाणी टंचाई निवारणासाठी हिंगोलीच्या जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 6 कोटी 18 लाख 73 हजार रुपयांची मागणी केली आहे. 2017-18 या वर्षासाठी 3 कोटी 64 लाख 42 हजार रुपये निधी पाणी टंचाईच्या उपाययोजनेसाठी लागला होता. त्यापैकी 3 कोटी 62 लाख 87 हजार रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असुन पंचायत समिती, जिल्हा परिषद व संबंधित यंत्रणांना हा निधी वितरीत करण्यात आला आहे. मागील वर्षाची पाणी टंचाईची 1 लाख 55 हजाराची उधारी चुकती करण्यासाठी या रक्कमेची प्रतिक्षा असतांनाच यंदाच्या वर्षी अर्थात सन 2017-18 च्या टंचाई उपाययोजनेकरिता आवश्यक असलेला 6 कोटी 18 लाख 73 हजाराचा निधी अद्यापही प्राप्त झालेला नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले. त्यामुळे टंचाई उपाययोजनेची कामे यावर्षी देखील उधारीवरच सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या