महिला दिन विशेष-लग्नाच्या ३० वर्षांनंतर कन्यारत्नाचे आगमन

पंजाबराव मोरे, संभीनगर

तब्बल ३० वर्षांपासून समाजाच्या तोंडून छळणारा ‘वांझोटी’ शब्द आज कन्यारत्न प्राप्त झाल्याने गळून पडला. त्यामुळे स्वर्ग दोनच बोटे उरल्याचा आनंद पुत्रप्राप्तीसाठी आसुसलेल्या मातेने व्यक्त करून आपल्या घुसमटलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

सोयगाव तालुक्यातील किन्ही येथील अंबादास गोरे यांच्या कुटुंबात चार भाऊ. मात्र यातील दोघांना संतती नव्हती. घरात तान्हुल्याच्या बोबड्या बोलांसाठी अंबादास आणि त्यांच्या पत्नी सुमनबाई यांचे कान आसुसले. ३० वर्षांपूवी लग्न झाले, मात्र संसारवेलीवर फूल लागत नव्हते. दिवस जसजसे जात होते तसतशी पुत्रप्राप्तीसाठी या दाम्पत्याला चिंता लागू लागली. हळूहळू घरातील वडीलधारी मंडळी, शेजारपाजारी, गाव आणि नंतर पंचक्रोशीत अंबादास यांना मूलबाळ होत नाही याची चर्चा होत गेली.

काही वर्षांनी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत सुमनबार्इंना डावलले जाऊ लागले. ज्यांच्या घरी मूल जन्मास आले, त्यांच्या घरी सव्वा महिना येण्यास त्यांना मज्जाव केला जाऊ लागला. काही समजदार महिलांनी मात्र या गोष्टीवर विश्वास न  ठेवता सुमनबाईकडे आपली नवजात मुलं आवर्जून दिली. काहींनी तर वांझोटी म्हणून हिणवले. हे सांगताना सुमनबार्इंना भावना आवरता आल्या नाही. ३० वर्षे या सामाजिक दिव्यातून जात असताना प्रचंड भावनिक छळ झाल्याच्या आ’वणींना त्यांनी उजाळा दिला. सुमनबाई यांनी आपली व्यथा पुढीलप्रमाणे कथन केली. जवळच्या आणि परक्यांच्या अशा वागण्यातून माझी होणारी घुसमट बघून मैत्रीतील महिलांनी यातून मार्ग काढण्यासाठी जो उपाय-इलाज, नवस-सायास सांगितले, ते आम्ही दोघांनीही केले. २५ वर्षांत डॉक्टरांचा सल्ला, औषधोपचार घेतले, मात्र काहीही उपयोग झाला नाही.

चाळीशी ओलांडल्यामुळे मासिक पाळी बंद झाली. त्यामुळे आता संततीची अपेक्षा सोडण्याचा विचार आम्ही केला होता. आता काय करावे, या द्विधा मन:स्थितीत असताना संभाजीनगर येथील डॉ. अपर्णा राऊळ यांच्या नोबल नर्सिंग होम येथील मॉर्फिअस इंटरनॅशनल आयव्हीएफ सेंटरविषयी माहिती मिळाली.  आम्ही आशा सोडली होती. तरी शेवटचा प्रयत्न म्हणून एप्रिल २०१७ मध्ये पहिल्यांदा डॉ. राऊळ यांची भेट घेतली. त्यांनी मेनोपॉजविषयी माहिती सांगितली. त्यांनी काही तपासण्या करून सकारात्मकता दाखविली आणि एका महिन्याची औषधं दिली. त्या घेतल्यानंतर पुन्हा तपासणी केली आणि त्यांनी मला येथे भरती होण्यास सांगितले. माझ्यासोबत पती आणि माझ्या बहिणीची मुलगी नीलिमा आली. सव्वा महिन्याने तपासणी केली असता डॉक्टरांनी मला गर्भधारणा झाल्याची बातमी दिली. आम्हाला खरे वाटत नव्हते, पण डॉक्टर अपर्णा राऊळ यांनी मला मे २०१७ पासून रâग्णालयात दाखल करून घेतले आणि यांनी घराप्रमाणे मला जपले आणि माझ्या पोटी कन्यारत्न जन्मास घातले. त्यांच्या प्रयत्नांमुळे माझ्या आयुष्यात जगण्याची उमेद निर्माण झाल्याचे सुमनबार्इंनी सांगितले.

प्रामाणिकपणे केलेल्या उपचारांचे फळ

सुमनबार्इंची तपासणी करताना त्या फार निराश झाल्याचे जाणवले. मात्र त्यांच्या तपासणीत सकारात्मक बाबी आढळल्याने त्यांना महिनाभराची औषधी दिली. त्याला फळ आल्याने त्यांना रुग्णालयातच भरती करून घेतले. पैसे कधी मागितले नाहीत. मेपासून आजवर त्या रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर मनापासून केलेले उपचार आणि त्यांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळे सुंदर मुलगी जन्माला आली. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच खरे बक्षीस असल्याचे डॉ. अपर्णा राऊळ यांनी सांगितले.