माऊलींचा प्रसाद १५ रूपये

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

पंढरपूर येथे विठ्ठल माऊलींच्या दर्शनानंतर भक्तांना देण्यात येणाऱ्या लाडूची किंमत दीडपटीनं वाढवण्यात आली आहे. पूर्वी प्रसादाच्या दोन लाडूचे पाकीट दहा रुपयांना मिळत असे. आता या पाकिटाची किंमत १५ रुपये झाली आहे.

पूर्वी हा लाडूचा प्रसाद मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांच्याकडून बनवला जात असे. मात्र नवीन आलेल्या पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने मंगळवेढा येथील सुवर्णक्रांती सहकारी महिला संस्थेस लाडू बनविण्याचा ठेका दिला आहे. ही संस्था १२ रूपये ५० पैसे या दराने लाडू पाकिट देत आहे मात्र मंदिर समिती हेच पाकीट १५ रूपये दराने भाविकांना विकत आहे. त्यातून एका पाकीटामागे २ रूपये ५० पैसे मंदिर समितीला मिळतात. विठ्ठल मंदिरातून दरवर्षी जवळपास ५० लाख लाडूप्रसादाची खरेदी भाविकांकडून होत असते. याचाच अर्थ केवळ लाडूप्रसाद विक्रीतून १ कोटी २५ लाख रूपयांचा फायदा मंदिर समितीला मिळतो. मंदिराच्या विकासासाठी व भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी देत असताना लाडूदरवाढ का, असा संतप्त सवाल केला जात आहे.