आत्महत्या केलेल्या महिला कॉन्स्टेबलच्या प्रियकरचाही गळफास

सामना प्रतिनिधी । मुंबई

नोव्हेंबर महिन्यात महिला कॉन्स्टेबलने केलेल्या आत्महत्येनंतर मानसिकदृष्टय़ा खचलेल्या तिच्या प्रियकरानेही थर्टी फर्स्टच्या सकाळी गळफास लावून घेतला. मुकेश बोरगे (25) असे या तरुणाचे नाव असून त्याचे वडीलही मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. महिला कॉन्स्टेबलच्या आत्महत्येनंतर मुकेश याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नायगाव येथील सशस्त्र विभागात कार्यरत असलेल्या मंजू गायकवाड (28) हिने 28 नोव्हेंबर 2017 रोजी गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या पोलीस बहिणीने केलेल्या आरोपानंतर मुकेश याच्यावर भोईवाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुकेश आणि मंजू यांचे प्रेमसंबंध होते, मात्र तो लग्नास नकार देत असल्याने मंजूने आत्महत्या केल्याचे तिच्या बहिणीने तक्रारीत म्हटले होते.

मुकेश हा देखील दादर-नायगाव येथील बीडीडी चाळीत राहत होता. थर्टी फर्स्टच्या सकाळी त्याने घरात कोणी नसताना आत्महत्या केली. आई घरी परतली त्यावेळी आवाज देऊनही मुकेश दरवाजा उघडत नव्हता. दरवाजा तोडला त्यावेळी मुकेश गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. घटनास्थळावर कोणतीही चिठ्ठी अगर लिखित स्वरूपात काही मिळाले नसल्याचे भोईवाडा पोलिसांनी सांगितले. मुकेशचे वडीलही मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत.