नऊ हजारांची लाच घेताना गटशिक्षणाधिकाऱयाला अटक

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन। धुळे

शिक्षण सेवकांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नियमित वेतनश्रेणी लागू व्हावी म्हणून सेवा पुस्तक अद्ययावत करून देण्यासाठी शिक्षकांकडून नऊ हजारांची लाच घेताना गट शिक्षणाधिकारी  सुरेखा देवरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

पंचायत समिती कार्यालयात २७ शिक्षक आणि शिक्षिकांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे देण्यात आले होते. पण जिल्हा परिषदेने सेवापुस्तक अद्ययावत करून द्या अशी भूमिका घेतली. त्यानुसार शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी देवरे यांच्याकडे सेवापुस्तकाच्या नोंदी अद्ययावत करण्याबाबत विनंती केली, पण देवरे यांनी त्या मोबदल्यात प्रत्येकी तीन हजार रुपयांची मागणी केली. एका शिक्षिकेच्या पतीला देवरे यांना तीन हजार रुपये देणे योग्य वाटले नाही. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे देवरे यांच्या विरोधात तक्रार केली. मंगळवारी सायंकाळी देवरे यांनी लाचेची रक्कम घेऊन शिक्षिकेच्या नातेवाईकांना घरी बोलावले. त्याचवेळी अन्य दोन शिक्षकांनादेखील बोलावण्यात आले होते. तीन सेवा पुस्तके अद्ययावत करून देण्याच्या मोबदल्यात देवरे यांनी नऊ हजार रुपये स्वीकारले. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने देवरे यांच्या घरी छापा घातला.