पाकिस्तानमध्ये 400 वर्ष जुन्या ऐतिहासिक गुरुनानक महालाची तोडफोड

64

सामना ऑनलाईन । लाहोर

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात काही समाजकंटकांनी ऐतिहासिक गुरुनानक महालात तोडफोड केली असून मौल्यवान वस्तूही चोरून नेल्या आहेत. या कृत्यामागे पुरातत्व विभागाच्या काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. ‘डॉन’ या वृत्तपत्राने याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार या चारमजली इमारतीच्या भिंतीवर गुरुनानक यांच्याबरोबरच हिंदू राजे व राजकुमारींचीही चित्रे होती. तोडफोडीत ती चित्रे देखील नष्ट करण्यात आली आहेत.

एवढेच नाही तर महालातील सुंदर नक्षीकाम केलेल्या महागड्या खिडक्या आणि दरवाजेही चोरट्यांनी पळवून नेले व विकले. बाबा गुरुनानक यांचा हा महाल 400 वर्ष जुना होता. या महालात माथा टेकण्यासाठी हिंदुस्थानसह परदेशातूनही अनेकजण पाकिस्तानमध्ये येत असत. लाहोर पासून 100 किमी अंतरावर असलेल्या नारोवाल शहरात हा महाल उभारण्यात आला होता. यात 16 खोल्या असून प्रत्येक खोलीत 3 दरवाजे व उजेड येण्यासाठी 4 खिडक्या होते.

दरम्यान, महालात तोडफोड होत असल्याची तक्रार स्थानिकांनी पुरातत्व विभागाकडे केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या