नगर तालुक्यातील अरणगाव तलाव ओव्हरफ्लो

सामना प्रतिनिधी । नगर

शहरालगत असलेला अरणगाव तलाव अचानक फुटल्याने वाळुंज येथील परीट वस्तीतील ४० जण घरात अडकले आहेत. प्रशासनाने मदतकार्य सुरू केले असून एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी पाचारण केले आहे.

तलाव ओसंडून वाहत होता. तलावाची दुरवस्था झाली असल्याने येथील नागरिकांना तत्काळ सुरक्षिततेसाठी अन्यत्र हलविण्याची मोहीम रात्री उशिराने सुरू करण्यात आली होती. मात्र, अरणगाव येथील तलाव फुटल्याने परिसरात पाणी शिरले. पाणी वस्तीपर्यंत गेल्याने काही ग्रामस्थांनी घराच्या छताचा आधार घेतला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुधीर पाटील घटनास्थळी दाखल झाले, मात्र ग्रामस्थांपर्यंत पथकाला पोहचता येत नव्हते. लष्कराच्या मदत पथकालाही वस्तीपर्यंत पोहचणे रात्री उशिरापर्यंत शक्य झाले नव्हते.

अरणगाव-सोनेवाडी रस्त्यावर हा तलाव असून गेले दोन दिवस पडलेल्या सततच्या पावसाने पाणी तलावावरून भरून वाहू लागले आहे. तलाव हा केव्हाही फुटू शकतो असा अंदाज येथील नागरिकांनी बोलून दाखवला होता. आज सायंकाळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदेश कार्ले, सभापती रामदास भोर, तहसीलदार सुधीर पाटील यांसह आजूबाजूचे नागरिक हे तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी मदतकार्य सुरू केले. त्यातच पाऊस सुरू असल्याने अडथळे निर्माण होत आहेत.