खंडेरायाच्या विवाहसोहळ्यास लाखो भाविक

सामना ऑनलाईन । कराड

महाराष्ट्रासह देशभरातून आलेले लाखो भाविक आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत दिमाखादार भंडाऱ्या न्हावून निघालेल्या पालनगरीमध्ये खंडेराय-म्हाळसा देवीचा विवाहसोहळा पार पडला.

भक्तांचा पाठीराखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री खंडोबास बोहल्यावर चढताना पाहण्यासाठी यावर्षीही भाविकांचा जनसागर लोटला होता. यावर्षी सुमारे सहा लाख भाविक पालनगरीत आले होते. प्रशासन, देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा कमिटीने केलेल्या योग्य नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यामुळेच प्रचंड मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असूनही सर्वांना भक्तिभावाने हा विवाह सोहळ्याचा क्षण डोळ्यांत साठवता आला.

दुपारी देवस्थानचे मानकरी देवराज पाटील यांचे आगमन झाल्यावर मिरवणूक निघाली. फुलांनी सजलेल्या छत्र्या, चोपदाराचा घोडा, सासनकाठी, पालखी, त्यापाठोपाठ श्री खंडोबा व म्हाळसाची मिरवणूक चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करीत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष केला.

मिरवणूक तारळी नदीपात्रात येताच लाखो भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करीत खंडोबा व म्हाळसा यांचा जयजयकार केला. सायंकाळी सहाच्या सुमारास मिरवणूक नदीपात्रातून मारुती मंदिर मार्गे बोहल्याजवळ आली. देव मंडपात आल्यानंतर देवास स्नान घालण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा व म्हाळसा यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

योग्य नियोजनाबद्दल पोलीस आणि प्रशासनाचे भाविकांकडून कौतुक

यात्रा शांततेत पार पाडल्याबद्दल देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, उपजिल्हा पोलीसप्रमुख विजय पवार, प्रांताधिकारी हिम्मत खराडे पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे, तहसीलदार राजेंद्र शेळके, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जोतिराम गुजवंटे यांनी गर्दीचे योग्य नियोजन केले होते. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून आलेल्या भाविकांना विनासायास श्री खंडोबाचे दर्शन मिळावे यासाठी देवस्थान ट्रस्टने केलेल्या शिस्तबद्ध दर्शनबारीचेही भाविकांकडून स्वागत होत होते.