लक्ष्मीपूजन

आज लक्ष्मीपूजन… लक्ष्मीमातेचा वास सदोदित आपल्या घरी असावा असे प्रत्येकालाच वाटते…

आश्विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे. या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते. या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले अशी कथा आहे.

लक्ष्मीपूजनाकरिता आपण घरातील सोन्याचे दागदागिने, सोन्याचांदीचे जिन्नस व चांदीची नाणी एकत्र करून तीच लक्ष्मी मानून तिची पूजा करतो. सर्वत्र लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाने पैसा, संपत्ती तसेच सर्व प्रकारचे वैभव प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा असते. लक्ष्मी ही संपत्तीची देवता… तशीच ती नित्य विष्णूच्या सेवेत असते हेही तितकेच खरे आहे. हरिप्रिया म्हणजे श्रीहरीला प्रिय अशी ती आहे. श्रीविष्णूला सोडून ती जात नाही. अशा परिस्थितीत दिवाळीच्या प्रसंगी लक्ष्मीपूजनाच्या वेळी तिला आवाहन केल्यास ती एकटी कशी येईल. ती तर विष्णूच्या सेवेत गर्क आहे. श्रीविष्णू हा क्षीरसागरी शेषाच्या शय्येवर विराजमान असून हरिप्रिया लक्ष्मी ही त्याच्या सेवेत रममाण झालेली आहे.

अशी करा पूजा

‘ॐ गं गणपतेय नमः’ म्हणत पूजा करावी. नंतर प्रथम सुपारी स्वरूपात गणपती हा दक्षिणेकडे पानावर अक्षता ठेवून पूजन करा. मग भूमी म्हणजे पृथ्वीपूजन करा. नंतर दीपनाथ म्हणजे दिव्याची व सूर्याच्या पूजन करा. त्यानंतर श्रीगणेशाच्या उत्तर दिशेने मंगल कलश स्थापना करून पूजन करा. मग ‘श्री लक्ष्मी’च्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या अधिकारप्राप्तीसाठी मन व मानवस्वरूप शरीर शुद्ध करणे ते म्हणजे प्रथम ‘ॐ श्री महालक्ष्मी नमः’ असे म्हणून हृदयास उजवा हात लावा. मग शिरसो म्हणजे डोक्याला हात लावून मग शिखा म्हणजे डोक्याच्या मागच्या बाजूला हात लावून मग शरीराला कवच म्हणजे दोन्ही बाहूंना हात लावून कवच करावे. मग अनामिका व तर्जनी हे दोन्ही बोटे डोळे मिटून स्पर्श करा. मग उजव्या कानाकडून हात फिरवून डाव्या हातावर तळी वाजवावी मग लक्ष्मी पूजन करावे व प्राणप्रतिष्ठा करावी.

यासोबत श्री महाकाली (काळी शाई) किंवा श्री महालक्ष्मी (धन/रुपये /श्रीमहालक्ष्मीची मूर्ती/श्रीयंत्र) किंवा महासरस्वती (वही/खाते)व चित्रगुप्त(पेन/दऊत) व कुबेर पूजन (तिजोरी/मातीचे बोळके कुबेर भंडार स्वरूपात) पूजन करावे व नैवेद्य म्हणून श्रीमहालक्ष्मी प्रिय असणारी पुरणपोळी, दुधाची बासुंदी, तांबूल व आरती करावी.

श्रीमहालक्ष्मी प्राप्तीसाठी असे करा विशेष पूजन

रात्री स्थिर सिंह लग्नात श्रीमहालक्ष्मीला प्रिय असणारे कमल फूल 16 किंवा 108 आणि कमल गुट्टा 108 आणि 108 मुरड शेंग ‘ॐ श्री महालक्ष्मी नमः’ असा मंत्र म्हणून अर्पण कराव्या. पुन्हा आरती करावी. श्री महालक्ष्मीचा अभिषेक केल्यानंतर तिर्थ हे आपल्या घराच्या आतच शिपडावे. या दिवशी घराच्या बाहेर तीर्थ टाकू नये.

दिवाळीच्या रात्री 12.11 वाजल्यापासून ते 12.41 पर्यंत आपले पूर्ण घर झाडून घेऊन घरातील पूर्ण कचरा काढून घराबाहेर नेऊन टाकावा. याने लक्ष्मी निस्सारण म्हणजे अकारण होणारा खर्च नष्ट होतो. या दिवशी श्रीलक्ष्मी स्वरूप असलेले आपले चारचाकी वाहन व दुचाकी वाहन, घरातील प्रवेशदाराचा उंबरठा, झाडू, ऊस, धान्यलक्ष्मी, सुवर्ण अलंकार, गोमाता, तिजोरी, यंत्र अशा अनेक श्रीमहालक्ष्मी स्वरुपात पूजन करावे.

> दिवाळीच्या दिवशी घरातील सर्वच सदस्यांना केसराने टिळा लावायचा. यामुळे घरात पावित्र्याचे वातावरण तयार होते.

> महालक्ष्मीची पूजा करताना स्फटिक श्रीयंत्र ठेवणे शुभ मानले जाते. पूजेनंतर हे स्फटिक श्रीयंत्र आपल्या नेहमीच्या जागी ठेवून द्यावे.

> शक्य होईल तर पिंपळाचे झाड शाळा किंवा मंदिराच्या बाजूला लावा. या झाडाची नित्यनियमाने देखभाल करा.

> पूजेत हळदीच्या ७ गाठी ठेवाव्यात. पूजा पूर्ण झाली की हळदीच्या या गाठी पुन्हा जागच्या जागी नेऊन ठेवायच्या.