लालबाग, परळ, शिवडीचा पाणी प्रश्न सुटणार; 19 एमएलडी पाण्याचा पुरवठा करणार

3

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या लालबाग, परळ, शिवडी आणि काळाचौकीचा पाणी प्रश्न आता सुटणार आहे. आज शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी पालिका अभियंत्यांच्या कार्यालयावर धडक दिली आणि त्यांचे अक्षरशः धाबे दणाणले. या अधिकाऱ्यांना पाणीपुरवठय़ाबाबत जाब विचारल्यानंतर त्यांनी या भागातील पाणीप्रश्न येत्या 48 तासांत सोडवण्याचे आश्वासन दिले. शिवसेनेच्या दणक्याने अखेर गेल्या तीन महिन्यांपासून पाणीप्रश्न सुटणार आहे.

या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबाबत स्थानिक रहिवाशांच्या वारंवार तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार आणि नगरसेवकांनी पालिका अधिकारी, अभियंत्यांबरोबर वारंवार बैठका घेतल्या, त्यांना संबंधित ठिकाणी नेऊन पाण्याच्या पाइपलाइनची तसेच अन्य बाबींची पाहाणी तसेच पडताळणीही केली. तरीही या भागातील पाणीप्रश्न सुटत नव्हता. आधीच उन्हाळा त्यात पाण्याची टंचाई. धरणांतील पाणीसाठाही कमी होत चालला आहे. राखीव साठय़ातून मुंबईला पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पुढील दिवस काढायचे कसे असा यक्षप्रश्न येथील रहिवाशांसमोर होता. अखेर आज स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एफ दक्षिणमधील सर्व नगरसेवकांनी वरळी हब येथील जलअभियंता अशोककुमार तवाडीया यांना पाणीपुरवठय़ाबाबत जाब विचारला. स्थानिक रहिवाशांनी पाणीसमस्येबाबतचा पाढाच यावेळी वाचला. यावेळी सर्व अधिकारीही उपस्थित होते. अधिकारी, नगरसेवक आणि आमदारांमध्ये आक्रमक चर्चाही झाली. त्यानंतर तवाडीया यांनी येत्या 48 तासांत पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी महापौर श्रद्धा जाधव, प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे, अनिल कोकीळ, सचिन पडवळ, सिंधू मसुरकर, शाखाप्रमुख जयसिंग भोसले आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिले

  • सध्या स्थानिक रहिवाशांना 16 एमएलडी म्हणजेच दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत होता. आता 19 एमएलडी इतका पाणीपुरवठा करण्यात येईल.
  • स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या तसेच अन्य बाबींची पडताळणी करण्यात येईल.
  • भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही  हे लक्षात घेऊन हा पाणी प्रश्न सोडवला जाईल.