कुत्र्यांच्या भुंकण्याने लालूप्रसाद त्रस्त

सामना ऑनलाईन । रांची

चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थानमध्ये (रिम्स) उपचार सुरू आहेत. मात्र, या रुग्णालयात कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे लालूप्रसाद त्रस्त आहेत. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे आपल्याला शांतपणे झोप येत नाही. त्यामुळे या रुग्णालयात नव्याने बनवण्यात आलेल्या पेईंग वॉर्डमध्ये आपल्याला हलवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

लालूप्रसाद या रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागात उपचार घेत आहेत. त्यांना ठेवण्यात आलेला वॉर्ड बिल्डिंगच्या कॅम्पसजवळ आहे. कॅम्पस मोकळे असल्याने येथे भटक्या कुत्र्यांचा नेहमी वावर असतो. त्यांच्या भुंकण्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. 10-20 कुत्रे एकत्र असल्याने कोणताही कर्मचारी त्यांना हाकलण्याचा प्रयत्न करत नाही. रात्री कुत्रे भुंकायला लागल्यावर रुग्णांची झोपमोड होते. रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा त्रास सहन करावा लागतो, तर दिवसा शौचालयाच्या दुर्गंधीतच वॉर्डमध्ये राहावे लागत असल्याचे लालूप्रसाद यांनी सांगितले. आपल्या वॉर्डजवळच शौचालय असल्याने त्याची दुर्गंधी येत असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयात नव्याने बनवण्यात आलेल्या पेईंग वॉर्डमध्ये आपल्याला हलवल्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा होईल असे त्यांनी सांगितले. पेईंग वॉर्डमध्ये हलवल्यास रुग्णालयाचे बिल भरण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

लालूप्रसाद यादव यांचा वैद्यकीय अहवाल सोमवारी मिळणार आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी त्यांचे रक्त तपासणीसाठी घेण्यात आले होते. शनिवारी मिळालेल्या अहवालात त्यांच्या शरीरात काही संसर्ग झाल्याचे आढळले होते.