लालू अडचणीत; मुलांची संपत्ती जप्त, आयकर विभागाची कारवाई

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यांच्या मुलांची बेहिशेबी संपत्ती आयकर विभागाने जप्त केली आहे. आयकर विभागाने राज्यसभेची खासदार आणि लालूप्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती आणि लालूप्रसाद यादव यांचा छोटा मुलगा बिहारचे उपमुख्यमंत्री असलेला तेजस्वी यादव यांची बेनामी संपत्ती जप्त केली आहे. तसेच जुलै महिन्यात आयकर विभागाच्या कार्यालयात हजर होऊन यासंदर्भातले स्पष्टीकरण द्यावे असेही आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांच्यासह मुलांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

२३ मे रोजी आयकर विभागाने लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित असलेल्या २२ ठिकाणी छापे मारले होते. त्याआधी लालू प्रसाद यांची मुलगी मीसा आणि तिचा पती शैलेश कुमार यांना आयकर विभागाने समन्स बजावले होते.६  जून रोजी हे दोघेही हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांना १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. याबाबत सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा वापर राजकीय स्वार्थासाठी होत असल्याचा आरोप लालु प्रसाद यादव यांनी केला होता.