लालूंच्या शिक्षेची सुनावणी पुढे ढकलली

सामना ऑनलाईन । रांची

चारा घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरविल्यानंतर बुधवारी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बुधवारची सुनावणी पुढे ढकलली आहे. सीबीआयच्या न्यायालयातील वकील विंदेश्वरी प्रसाद यांच्या निधनामुळे ही सुनावणी गुरुवारी होणार आहे.

बुधवारी लालू प्रसाद यादव यांना न्यायालयात रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र प्रसाद यांच्या निधनामुळे न्यायालयाचे कामकाज तहकूब करण्यात आले व चारा घोटाळ्याची सुनावणी गुरूवारपर्यंत पुढे ढकलली. त्यानंतर पुन्हा लालू प्रसाद यांना बिरसा मुंडा तुरूंगात नेण्यात आले.

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविले होते. याप्रकरणी ३ जानेवारीला त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार होती. तेव्हापासून लालू प्रसाद यादव हे रांचीच्या बिरसा मुंडा तुरूंगात आहेत.