सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी जमीनमालकांनी दिली संमतीपत्रे

85

सामना प्रतिनिधी, मालवण

तोंडवळी-वायंगणी माळरानावर प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रकल्पाचे समर्थन करत स्थानिक 40 टक्के जमीनमालकांनी आपली समंतीपत्रे मुख्यमंत्री कार्यालय तसेच भाजपच्या जिल्हा कार्यालयाकडे सादर केली आहेत. स्थानिकांची घरे तसेच मंदिरे यांना धक्का न लावता बीच, हिस्ट्री आणि अ‍ॅग्रो टुरिझम यांचा समन्वय साधून हा जागतिक दर्जाचा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे 350 एकर जागेत साकारण्यासाठी भाजपच्यावतीने यशस्वी प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत दिली.

मालवण तालुका भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष बबलू राऊत, माजी सभापती धोंडी चिंदरकर, प्रमोद करलकर, विनोद भोगावकर आदी उपस्थित होते. तोंडवळी-वायंगणी माळरानावर साकारल्या जाणार्‍या सी-वर्ल्ड या प्रकल्पाबाबत प्रशासन व जनता यांच्यात असलेल्या असमन्वयामुळे गेल्या दहा वर्षात हा प्रकल्प रखडला. या प्रकल्पाची जबाबदारी पुणे येथील पुणे सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क या संस्थेकडे दिली होती. या संस्थेत जे शास्त्रज्ञ, सल्लागार होते त्यांनी राजीनामे दिल्याने या संस्थेकडून या प्रकल्पाचे कामकाज झाले नाही. त्यामुळे या संस्थेला काळ्या यादीत टाकून त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली जाणार आहे असे मोंडकर यांनी सांगितले.

चिपी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनाच्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सी-वर्ल्ड प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे सूतोवाच केले. त्यादृष्टीने जिल्हा भाजपच्यावतीने कार्यवाहीस सुरवात केली आहे. हा प्रकल्प व्हावा अशी इच्छा असल्याने स्थानिक 40 ते 45 जमीनमालकांनी संमतीपत्रे मुख्यमंत्री कार्यालय तसेच भाजप कार्यालयाकडे सादर केली आहे. येत्या काळात सुमारे 70 ते 80 टक्के जमीनमालक आपली संमतीपत्रे देतील असा विश्‍वास मोंडकर यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पाबाबत अपप्रचार झाला. मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार असून येथील शेती, बागायती, मासेमारी व राहणीमान यावर कोणताही परिणाम होऊ दिला जाणार नाही. सी-वर्ल्ड प्रकल्प हा विनाशकारी नसू स्थानिक ग्रामस्थांची घरे, शेती, गोठे, मंदिरे ही अबाधितच राखूनच हा प्रकल्प साकारला जाईल. ज्यांचा विरोध आहे त्यांच्याकडून गावपातळीवर माहिती घेत त्यांच्यातील गैरसमज दूर केला जाईल. मात्र कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही. ज्या जमिनमालकांनी संमती दिली त्यांचीही लवकरच बैठक घेतली जाईल. जे प्रकल्पास जागा देत काही जागा विकसित करून मागत असतील त्यांना ती देण्याबाबत प्रयत्न केले जातील. असे मोंडकर यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कील डेव्हलपमेंट सेंटर

सी-वर्ल्ड प्रकल्पामुळे तोंडवळी- वायंगणी भागास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या दृष्टिकोनातून स्थानिकांना रोजगार प्रशिक्षण देण्यासाठी तोंडवळीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कील डेव्हलपमेंट सेंटर व्हावे अशी मागणी भाजपच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विधानसभेपूर्वी सी-वर्ल्ड प्रकल्पाचे अथवा स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे भूमिपूजन व्हावे यासाठी जिल्हा भाजपच्यावतीने प्रयत्न केले जाणार असल्याचेही मोंडकर यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या