कल्याण-डोंबिवलीत खाडी बुजवून चाळी उभारण्याचा गोरखधंदा

सामना प्रतिनिधी । कल्याण

कल्याण – डोंबिवलीच्या खाडीलगत कांदळवन आणि तिवरांच्या झाडाची कत्तल करून भूमाफियांनी अनधिकृत चाळी उभारण्याचा गोरखधंदा पुन्हा एकदा सुरू केला आहे. पालिका, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड आणि महसूल प्रशासन कारवाईबाबत एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने खाडीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.

कल्याण-डोंबिवली दरम्यान मोठागाव ते दुर्गाडी असा विस्तीर्ण खाडीकिनारा आहे. मात्र मोठ्य़ा प्रमाणात होत असलेली तिवरांची कत्तल आणि रेती उत्खननामुळे खाडीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला होता. शिवाय खाडीकिनारी अनधिकृत बांधकामेही वाढत होती. डोंबिवली देवीचापाडा खाडीकिनारी कांदळवन व तिवरांच्या झाडाची कत्तल करून अनधिकृत बांधकामे राजरोस सुरू आहेत. शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर तहसील कार्यालयाने दोन वेळा चाळी तोडण्याची कारवाई केली. मात्र तोंडदेखल्या कारवाईचा भूमाफियांवर काहीच परिणाम झाला नाही. शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी खाडी बुजवून दोन दिवसांत चाळी उभ्या केल्या जातात. देवीचापाडा येथे तर भूमाफियांनी बेकायदा बांधकाम साहित्याचा साठा केला आहे. तरीही पालिका प्रशासन, महसूल, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड काहीच कारवाई करत नसल्याने पर्यावरणप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

खाडी विकासाला मुहूर्त मिळेना

भूमाफिया आणि वाळूमाफियांना चाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी एप्रिल २०१७ मध्ये कल्याण खाडी येथे धाड टाकली होती. यावेळी क्रेन, बार्ज, बोटी, सक्शन पंप अशी रेती उत्खननाची मोठी साधनसामग्री नष्ट केली. या कारवाईदरम्यान त्यांनी रेतीमाफियांचे कायमचे कंबरडे मोडण्यासाठी महापालिकेस खाडीकिनारा विकसित करण्याची सूचना केली होती. याची दखल घेऊन पालिकेने खाडीकिनारा विकसित करण्याचा निर्णय घेतला. मात्र खाडीकिनारा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचा ना हरकत दाखला मिळणे आवश्यक होते. मात्र खाडीकिनारा विकसित करण्याचे काम रखडल्याने आता पुन्हा वाळूमाफिया सक्रिय झाले आहेत. शिवाय चाळमाफियांनी खाडी बुजवून बेकायदा चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे.