चक्रव्यूहात सापडलेली भाषा

शरद  विचारे

‘पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे’मधून संपूर्ण देशभरात मिळून ७८० भाषा असल्याचे आढळले आहे. या पाहणीने पूर्वीच्या जनगणनेत नोंदवलेल्या ११०० ही भाषासंख्याच गृहीत धरली. त्यातल्या जवळजवळ २२० भाषा अस्तंगत झाल्या आहेत असे दाखवून दिले आहे. त्यामुळे एकूणच गेल्या पाच दशकांमध्ये  २० टक्के भाषा नामशेष झाल्या अशी आकडेवारी हे सर्वेक्षण सांगते. त्यामागे एक कारण इंग्रजीच्या आक्रमणाचेही आहे. कारण मातृभाषेतून शिक्षण द्यायचे की इंग्रजीतून या प्रश्नात सर्वसाधारण पालक अडकले आहेत. साहजिकच मराठीसह सर्वच भाषा आज चक्रव्यूहात सापडल्या आहेत.

भाषेच्या दृष्टीने सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणूस आज विचित्र चक्रव्यूहात सापडला आहे. वस्तुतः सगळ्याच प्रमुख हिंदुस्थानी भाषा बोलणारे समाज आज या भाषक चक्रव्यूहात सापडले आहेत. कारण आपल्या मुलांना अभिमानाने मातृभाषेतून शिक्षण दिले तर ती इंग्रजीपासून दूर जातात, त्या भाषेला ते सरावत नाहीत. त्यामुळे चांगल्या पगाराच्या नोकऱ्या, उत्तमोत्तम संधींपासून ते लांब जातील आणि त्याचा आर्थिक फटका कुटुंबाला बसेल. त्याउलट मुलांना इंग्रजीतूनच शिक्षण दिले तर त्यांना चांगल्या संधी मिळतील ही त्यांची धारणा. पण इंग्रजीतून शिक्षण दिले तर ती हळूहळू मातृभाषेपासून दुरावत जातात, पण जगण्याच्या लढाईत ती वरचढ ठरण्याची शक्यता असते. कारण सामान्य माणसाचे देणेघेणे त्याच्या रोजच्या जगण्याच्या संघर्षांशी असते. त्यामुळे मातृभाषेपेक्षा तो रोजीरोटी मिळवून देणाऱ्या भाषेला प्राधान्य देणार हे साहजिकच आहे.

भाषा म्हणून मराठी आज आपल्याला चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देत नसेल, पण आपल्याला तिचा अभिमान आहे. कारण ती एका समाजाची ओळख आहे, अस्मिता आहे. अशीच आपली अस्मिता आपल्या बोलीभाषेशी असते. हीच भाषा आपण सर्वप्रथम ओळखतो, पण दुर्दैवाने तितक्याच लवकर ती विसरूही लागलो आहे. मराठी भाषेवर जसे इंग्रजीचे आक्रमण झाले तसेच आपल्या बोलीभाषेवर प्रमाण मराठीचे आक्रमण झाले. नव्या पिढीला आपल्या समाजाची भाषा फारशी माहीत नसते किंवा असेही म्हणता येईल की आपण आपल्या बोलीभाषेतून बोललो, भाषेविषयी बोललो तर आपली जात इतरांना समजेल असे त्यांना वाटते. मुंबई-पुण्यासारख्या महानगरांत बहुभाषकांचा आणि त्यांच्या भाषांचा खच पडला आहे. पण प्रत्येकजण आपण कसे सुशिक्षित आणि हिंदुस्थानच्या प्रमुख प्रवाहात आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी नव्या पिढीने मराठी भाषा घरात आणि इंग्रजी-हिंदी घराबाहेर स्वीकारली आहे. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेत ही गोष्ट अभिनंदनीय आहे, मात्र त्या समाजात त्या त्यांच्या भाषा बोलणाऱ्यांची संख्या विरळ होत आहे. समाजातील सर्व भाषांवर प्रमाण मराठीचे मोठे आक्रमण झाले आहे हे ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’या सर्वेक्षण प्रक्रियेत स्पष्ट झाले.

आता भाषांच्या सर्वेक्षणाचाच विषय निघाला आहे म्हणून हेही स्पष्ट केले पाहिजे की आपल्या देशातल्या भाषांचं यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. १०० वर्षांपूर्वी ते ब्रिटिशांच्या काळात सर जॉर्ज अब्राहम ग्रिअर्सन यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. सर जॉर्ज ग्रिअर्सन यांनी १८९८ ते १९०२ या काळात भाषिक पाहणीचे प्रमुख म्हणून काम पाहिले. पुढे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली १९२७ पर्यंत हे काम चालले. ग्रिअर्सन यांनी केलेले हे सर्वेक्षण हा हिंदुस्थानी भाषांचा पहिलावहिला शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणता येईल. त्यांनी ‘लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’चे १९ खंड प्रकाशित केले. त्या सर्वेक्षणानुसार तत्कालीन हिंदुस्थानात ३६४ भाषा आणि बोली बोलल्या जात होत्या. अलीकडचे ‘पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’ किंवा ‘हिंदुस्थानी भाषांचे लोकसर्वेक्षण’ हे लोकांनी, लोकांच्या प्रेरणेतून केलेले आहे. आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषाविषयक विविधतेचा, अस्तित्वाचा आणि किंचित अस्मितेचाही हा आविष्कार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे भाषांची आजची स्थिती व त्यांचे अस्तित्व दर्शवणारे हे सर्वेक्षण दीर्घकाळानंतर झालेले आहे. पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हेमधून संपूर्ण देशभरात मिळून ७८० भाषा असल्याचे आढळले आहे. या पाहणीने पूर्वीच्या जनगणनेत नोंदवलेल्या ११०० ही भाषासंख्याच गृहीत धरली. त्यातल्या जवळजवळ २२० भाषा अस्तंगत झाल्या आहेत असे दाखवून दिले आहे. त्यामुळे एकूणच गेल्या पाच दशकांमध्ये २० टक्के भाषा नामशेष झाल्या अशी आकडेवारी हे सर्वेक्षण सांगते. असो.

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर या लोकसर्वेक्षणातून आपल्याकडे ५२ बोली असल्याचे दाखविले आहे. त्यात १) मराठी, २) अहिराणी, ३) आगरी, ४) खान्देशी लेवा, ५) चंदगडी, ६) झाडी, ७) पोवारी, ८७) कोहळी,९) तावडी, १०) मालवणी, ११) वऱ्हाडी, १२) वाडवळी, १३) सामवेदी, १४) संगमेश्वरी.

आदिवासींच्या भाषा

१५) कातकरी, १६) कोकणी, १७) कोरकू, १८) कोलामी, १९) गोंडी, २०) देहवाली, २१) परधानी, २२) पावरी, २३) भिलालांची निमाडी, २४) मथवाडी, २५) मल्हार कोळी, २६) माडिया, २७) मावची, २८) मांगेली, २९) वारली, ३०) हलबी, ३१) ठाकरी, ३२) ‘क’ ठाकूरी, ३३) ढोरकोळी, ३४) ‘म’ ठाकुरी

भटक्या विमुक्तांच्या भाषा

३५) कुचीकोरवी, ३६) कैकाडी, ३७) कोल्हाटी, ३८) गोरमाटी, ३९) गोल्ला, ४०) गोसावी, ४१) घिसाडी, ४२) चितोडिया, ४३) छप्परबंद, ४४) डोंबारी, ४५) नाथपंथी डवरी, ४६) नंदीवाले, ४७) पारोशी मांग, ४८) पारधी, ४९) बेलदार,५०) मांग गारुडी, ५१) वडारी, ५२) वैदू यांचा समावेश आहे. शिवाय ५३) दख्खनी, ५४) ‘नो’ लिंग, ५५) उर्दू, ५६) सिंधी या अन्य भाषा आहेत. यातील दख्खनी ही भाषा केवळ मिरजजवळ बोलली जाते आणि ‘नो’ लिंग ही भाषा कोकणातील केवळ एकाच गावात बोलली जाते. बुलढाणा जिह्यात जवळपास १३० माणसेच मेहाली ही भाषा बोलतात हे विशेष.

या प्रत्येक प्रकारात त्या त्या ठिकाणच्या स्थानिक लोकजीवनातले अनेक शब्द आलेले दिसतात. हे शब्द लहान शब्दकोशात सापडतीलच असे नाही, पण ते त्यांच्या लोकजीवनाचा अविभाज्य अंग बनलेले आहेत. या शब्दांतून त्यांचे तत्त्वज्ञानही पाझरत असते. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण आपण मराठीत वाचतो, पण बोलीभाषेत तीच म्हण ‘पुढच्याच्या तुटल्या वहाणा, मागचा झाला शहाणा’ अशी म्हटले जाते. शब्द आणि लय या दोन्हींमध्ये दुसरी म्हण सरस ठरते. गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, शिकलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी आदी भटक्या जमाती सदैव भ्रमणात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्ये आपल्याच जमातीत राहावीत यासाठी ते या बोलीभाषांचा उपयोग करतात. चोरी हाच व्यवसाय असणाऱ्यांनी आपल्या ‘व्यवसाया’साठी एक पूर्ण वेगळी वैशिष्टय़पूर्ण अशी बोलीभाषा विकसित केली आहे. पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाने आपल्या खंडांमध्ये या ‘भाषे’चीही दखल घेतली आहे.

मराठी भाषा लवचिक आहे. थोडय़ा थोडय़ा फरकाने शब्दाचे अर्थ बदलतात. मुंबईची मराठी भाषा हल्ली खिचडी भाषा झाली आहे. शुद्ध मराठी राहिली नाही. तिच्यात हिंदी, मराठी, इंग्रजी यांची भेसळ झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी सिनेमा पाहून भाषा अशी झाली आहे. याच मुंबईला खेटून असलेल्या वसई-विरारमध्ये जवळपास सात ते आठ बोलीभाषा बोलल्या जातात. ही माणसे सुशिक्षित आहेत. गावात राहतात पण मुंबईला कार्पोरेट ऑफिसमध्ये काम करतात. रेल्वेत ही मंडळी भेटली की त्यांच्यातील संवाद बोलीभाषेतून होतो. त्यांना आपली बोलीभाषा बोलायला अजिबात लाज वाटत नाही. उलटपक्षी अलीकडे तर बोलीभाषेतून पुस्तके लिहिली जात आहेत. आपल्या बोलीभाषेतील लग्नगीते आदी संकलित करण्याचे मोठे काम आजचा हा सुशिक्षित समाज करत आहे. त्यामुळे मराठीसह बोलीभाषा मरेल की टिकेल याची चिंता करण्याचे काम नाही. खेडय़ापाडय़ातली रांगडी आणि अशुद्ध, अपभ्रंश असलेली भाषा असते. कशीही असो ती मराठीच आहे म्हणून मराठी माणसाला आवडते आणि आवडत राहणार.