जगविख्यात केंब्रिज विद्यापीठ ‘ही’ परंपरा मोडणार

सामना ऑनलाईन । इंग्लंड

परीक्षेचे पेपर हाताने लिहिण्याची तब्बल ८०० वर्षे जुनी परंपरा इंग्लंडमधील विख्यात केंब्रिज विद्यापीठाने मोडीत काढण्याचे ठरवले आहे. यापुढे पेपर सोडवण्यास लॅपटॉप किंवा आयपॅडचा वापर केला जाणार आहे. लॅपटॉपच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांची हाताने लिहिण्याची सवय मोडली आहे. म्हणूनच परीक्षाही लॅपटॉपवर घेण्याची परंपरा सुरू करण्याची गरज केंब्रिजमधील शिक्षकांनी व्यक्त केली आहे.

पंधरा-वीस वर्षांपूर्वीचे विद्यार्थी दिवसातून अनेक तास लिहीत असत. हाताने लिहिणे ही एक कला आहे. ती आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात लोप पावू लागली आहे. आताचे विद्यार्थी लिहिण्यापेक्षा लॅपटॉपवरच अधिक काम करतात. फक्त परीक्षेच्या वेळीच पेपर लिहिताना दिसतात. सवय मोडल्याने त्यांना वेळेत पेपर लिहिणेही कठीण जाते. त्यामुळे त्यांच्या परीक्षाही लॅपटॉपवरच घेण्याचा प्रयोग यंदाच्या वर्षी केला जाणार आहे, असे केंब्रिज विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. सारा पेरसल यांनी सांगितले.

विद्यापीठाचा हा निर्णय सर्वांनाच पटलेला नाही. हाताने लिहिणे बंद केले तर भविष्यात हस्ताक्षर दुर्मिळ होईल असे ब्रिटिश इन्स्टिटय़ूट ऑफ ग्राफोलॉजिस्टमधील हस्ताक्षरतज्ञ ट्रेसी ट्रसेल यांचे मत आहे. सोशल मीडिया किंवा आयपॅडवर विद्यार्थी वेगाने टाइप करतात हे मान्य असले तरी हाताने लिहिणेही थांबवता कामा नये असे ट्रसेल यांनी सांगितले. केंब्रिज विद्यापीठाने लॅपटॉपवर परीक्षा घेण्यास सुरुवात केली तर इंग्लंडमधील शाळाही त्याचे अनुकरण करतील अशीही चिंता तज्ञांनी व्यक्त केली.