जम्मू-कश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबा कमांडर ठार

2
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । बडगाम

जम्मू-कश्मीरमधील बडगामध्ये सुरक्षा पथकाशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा स्वयंघोषित कमांडर मुझफ्फर नायकू ठार झाला.

बडगाममधील मोचवा भागात दहशतवादी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली. या माहितीआधारे सुरक्षा पथकाने एका घराला घेराव घातला. पकडले जाऊ नये म्हणून घरातून मुझफ्फर नायकूने गोळीबार सुरू केला तसेच सुरक्षा पथकाच्या दिशेने ग्रेनेड फेकले. चकमकीदरम्यान ग्रेनेडच्या स्फोटात एक पोलीस जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घरातून जोरदार गोळीबार होत असल्याचे पाहून सुरक्षा पथकाने दहशतवादी नेमका कुठे आहे याचा अंदाज घेऊन गोळीबार सुरू केला आणि मुझफ्फर नायकू ठार झाला. नायकू मागील आठ वर्षांपासून जम्मू-कश्मीरमध्ये सक्रीय होता. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात होता; असे सुरक्षा पथकाने सांगितले.