खरेदी-विक्री संघाच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात

सामना प्रतिनिधी । लासलगाव

लासलगाव विभाग सहकारी खरेदी-विक्री संघ निवडणुकीच्या ११ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व दिंडोरीचे सहायक निबंधक महेश भडांगे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील हा पहिला खरेदी-विक्री संघ आहे, त्याचे एकूण ६३५० सभासद आहेत. या मंडळास शासनाने दिलेली मुदतवाढ २८ जानेवारीला संपली असून, आता निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. माघारीनंतर संघाच्या सहकारी संस्था गटात नितीन घोटेकर, स्त्री राखीव गटात निर्मला मेमाणे व मथुराबाई दरेकर, इतर मागास प्रवर्ग गटात किशोर दरेकर, भटक्या विमुक्त जाती जमाती गटात शांताराम नागरे, अनुसूचित जाती जमाती गटात धोंडीराम धाकराव हे बिनविरोध विजयी झाले.

इतर ११ जागांसाठी नानासाहेब पाटील, प्रकाश कापडी, शंकरराव कुटे, अनिल घोटेकर, विश्वास घोटेकर, जनार्दन जगताप, बळीराम जाधव, शिवाजी जाधव, दत्तात्रेय डुकरे, मधुकर दरेकर, प्रमोद पाटील, लक्ष्मण बडवर, सुरेश रायते व अनिल शिंदे रिंगणात आहेत.