हरिजन सेवक संघाच्या वसतीगृहाचे अनुदान रखडले

सामना प्रतिनिधी, धुळे

हरिजन सेवक संघाच्या वसतिगृहाचे अनुदान गेल्या अडिच वर्षापासून रखडले आहे. ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील मागासवर्गीय मुले-मुली या वसतीगृहात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून लवकरचं हे अनुदान न मिळाल्यास आदीवासी मुले शिक्षणापासून वंचित राहीली आहेत. अनुदान नाकारण्याचे कुठलेही सबळ कारण सरकार देत नसल्याचा आरोप वसतीगृह प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे.

हरिजन सेवक संघाची वसतिगृहे १९३९ आणि १९६२ पासून चालविण्यात येत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी धुळे जिल्हा हरिजन सेवक संघाची स्थापना झाली. संघाने सर्वप्रथम १९३९ ला आदिवासी आणि मागास मुलांसाठी वसतिगृह उभारले. त्यानंतर १९६२ पासून मुलींसाठीही वसतिगृह सुरू केले. वसतिगृहात राहण्याची सोय झाल्याने अनेक मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले.

शासनाने या दोनही वसतिगृहांना अनुदान दिले. शासनाकडून चालविल्या जात असलेल्या वसतिगृहांना दरडोई अडीच हजार रुपये अनुदान दिले जाते. तर सेवाभावी संस्थांनी चालविलेल्या वसतिगृहांना दरडोई ९०० रुपये अनुदान दिले जाते. परंतु १४ महिन्यांपासून अनुदान बंद झाले आहे. तर अडीच वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या मानधनाची रक्कमदेखील थकविण्यात आली आहे. यापूर्वी अनेकदा समाजकल्याण विभागाने वसतिगृहांना भेटी देऊन उपस्थितीची नोंद घेतली. शासनाकडून पूर्वी मिळत असलेल्या अनुदानाची आणि हिशेबाची माहिती घेतली. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी समाजकल्याण विभागाला अनुदान वितरित करण्याबाबत सुचना केल्या. मात्र तरीही अनुदान सुरू केलेले नाही. अनुदान मिळत नाही तोवर उपोषण मागे घेणार नाही, असे म्हणत वयोवृद्ध झुंबरलाल शर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.

समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी अनुदान वितरणाची तयारी लवकरच पूर्ण होईल, पण आता पुन्हा त्यांनी अनुदान मिळणार नाही असे सूचित केले. त्यामुळे बेमुदत उपोषणाचा बडगा उगारण्यात आला आहे.