मानाचा मुजरा

सामना प्रतिनिधी, मुंबई

गायन क्षेत्रात अनेक नवनवीन नावे येतात. यापैकी प्रत्येकजण लतादीदींची गाणी गातच वाटचाल करते

गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ७५ वर्षांच्या देदीप्यमान सांगीतिक कारकीर्दीला मानाचा मुजरा करण्यासाठी आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त ‘अमृत हृदयस्वरलता’ या गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हृदयेश आर्टस् आयोजित हा कार्यक्रम २६ ऑक्टोबर रोजी षण्मुखानंद सभागृहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन आणि दिग्दर्शन अभिनेता अन्नू कपूर करणार आहेत. त्यामुळे लतादीदींनी गायलेल्या गाण्यांच्या आठवणी, किस्से प्रेक्षकांना त्यांच्या खुमासदार शैलीत ऐकायला मिळतील. तसेच या वेळी प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे मंगेशकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत उषा मंगेशकर, राधा मंगेशकर, अलका याज्ञिक, संजीवनी भेलांडे, मधुरा दातार या गायिका आणि इतर गायक कलाकार लतादीदींनी गायलेली गाणी सादर करणार आहेत.

गायिका संजीवनी भिलांडे याबाबत सांगतात की, हृदयनाथजींकडे मी लहानपणापासून गाणं शिकलेय. त्यांच्या कार्यक्रमात गायलेही आहे. आज त्यांच्यामुळेच दर्जेदार गाणी आम्हाला गायला मिळत आहेत. त्यांचा आशीर्वाद ही आमची पुंजी आहे. हिंदुस्थानात जन्मलेली प्रत्येक मुलगी जिच्या गळ्यात सूर आहेत त्या प्रत्येक मुलीसाठी लतादीदी आदर्श आहेत. त्यामुळे आम्ही सर्व गायक स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, अशा युगात आम्ही जन्माला आलो. ज्या युगात लतादीदींनी गायलेल्या गाण्यांची देणगी आम्हाला लाभली आहे. त्यांची गाणी गायल्यानंतर गायकाला जी दाद मिळते ती खूप आनंद देणारी आणि प्रोत्साहित करणारी असते.

शब्दांमध्ये भाव आणणं गायकाचं कौशल्य
गाण्याची रचना शब्दांमुळे होते. संगीतकार त्या शब्दांची रंगसंगती सांगतो. प्रत्यक्षात गाण्यात जे नक्षीकाम, कोरीवकाम केलं जातं ते गायकाचं कौशल्य आहे. शब्दांमध्ये भाव आणणं, छोट्या छोट्या जागांना वळण लावणं यात लतादीदींचा हात आजही कोणीही पकडू शकत नाही. असं संजिवनी यांचं म्हणणं आहे.

प्रत्येक गाण्यात सौंदर्य लपलंय
लतादीदींनी गायलेल्या प्रत्येक गाण्यात सौंदर्य लपलंय. सिलसिला सिनेमात त्यांनी गायलेल्या ‘ये कहा आ गये हम’ या गाण्यामध्ये कोई और भी ‘मुलायम’ यातील मुलायम हा शब्द ऐकताना खरोखरच मुलायम असल्यासारखा भासतो. ‘दिलबर दिलसे प्यारे’ हे गाणं लाडीकपणे म्हटलंय त्यातील लडीवाळपणा भावतो. ‘मोहे पनघट’मधल्या ताना, सफाई, ‘किस मोडपे जाते है’ या गाण्यातला सुरुवातीचा आलाप, ‘जा मै तोसे नही बोलो’मधले हावभाव, ‘ओ मेरे सनम’मधला सुरुवातीचा आलाप, ‘कुछ दिलने कहा’मधला हळुवार भाव, ‘आ जाने जा’ गाण्यातलं कॅब्रे नृत्य प्रत्यक्ष त्यांच्या गाण्यातल्या शब्दात उतरल्याचा भास होतो. प्रत्येक गाण्यातील सुरावट, तान, आलाप यामुळे श्रोत्याला त्यांच गाणं आपलंस करतं.