‘अंड्याचा फंडा’ला लाभला लतादीदींचा शुभाशिर्वाद

सामना ऑनलाईन । मुंबई

दूरदर्शनवरच्या गाजलेल्या सीआयडी या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक संतोष शेट्टी यांच्या आगामी अंड्याचा फंडा या चित्रपटाला खुद्द लतादीदींचे आशीर्वाद लाभले आहेत. सीआयडी ही मालिका हिंदुस्थानच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनाही आवडते. त्यामुळे त्यांनी या मालिकेच्या लेखकाच्या आगामी चित्रपटासाठी आपले आशीर्वाद दिले आहेत. नुकतंच या चित्रपटातलं ‘गोष्ट आता थांबली’ हे गाणं लता मंगेशकर यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आलं.

याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक तसेच निर्मात्यांसोबत अथर्व बेडेकर, शुभम परब, मृणाल जाधव हे बालकलाकार आणि दीपा परब व सुशांत शेलार या कलाकारांनी लतादीदींच्या निवासस्थानी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे लतादीदींच्या हस्ते एका मराठी चित्रपटाचं गाणं सादर करण्याची ही पहिलीच वेळ असून, हे भाग्य ‘अंड्या चा फंडा’ या सिनेमाच्या टीमला लाभलं आहे.

आदर्श शिंदेच्या आवाजातलं हे गाणं क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलं असून, याला अमित राज यांनी संगीत दिलं आहे. रहस्य आणि शोधकथा लिहीण्यात विशेष हातखंडा असणाऱ्या संतोष शेट्टी यांनीच या चित्रपटाचं लेखन केलं असल्यामुळे, हा सिनेमा नक्कीच रोमांचक असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खुद्द लतादीदींना गूढ आणि शोधकथेवर आधारित असलेल्या मालिका तसेच सिनेमे बघायला भरपूर आवडतात आणि त्यामुळेच त्यांनी ‘अंड्याचा फंडा’ या चित्रपटातील गाण्याच्या प्रसिद्धीसाठी आपला अनमोल वेळ देऊ केला.

लतादीदींनी या सर्वांना शुभाशिर्वाद देत, सिनेमाच्या भरघोस यशासाठी शुभेच्छादेखील दिल्या. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेला हा चित्रपट अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी यांची निर्मिती असून प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी यांनी त्याची सहनिर्मिती केली आहे. तसंच पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिले असून हा चित्रपट येत्या ३० जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.