लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपापुढे गटबाजीचे आव्हान

2

सामना प्रतिनिधी। लातूर

लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी करण्यात सर्व पक्ष गुंतलेले आहेत. लातूरात भाजपापुढे अंतर्गत गटबाजीजेच मोठे आव्हान आहे. जिल्ह्यातील भाजपाच्या प्रत्येक गटाचा एक इच्छूक उमेदवार सध्या मतदारसंघात गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजपाचे सुनिल गायकवाड हे मोठ्या मताधिक्याने मोदी लाटेत निवडून आले. आता होणाऱ्या या निवडणुकीत मोदी लाट कुठेच दिसून येत नाही. भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी लातूरात केलेले वक्तव्य कोणालाही रुचलेले नाही. सत्तेची मस्ती चढली असल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहेत. त्यातच लातूरातील भाजपामध्ये अंतर्गत बंडाळी मोठ्या प्रमाणात आहे. लातूर जिल्ह्यात अनेक गट कार्यरत आहेत. या गटातटाच्या बंडाळीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कोणीच विचारत नाही हे शल्य अनेक पदाधिकाऱ्यांना आहे. सर्व नामधारी पदाधिकारी असल्याचे दिसून येत आहे.

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा एक गट तयार झालेला आहे तर मुख्यमंत्री यांचे स्विय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचा एक गट तयार आहे. या शिवाय रमेश कराडांचा गट, पंकजा मुंडे यांना मानणारा गट, आमदार सुधाकर भालेराव यांचा गट, माजी आमदार गोविंद केंद्रे यांचा गट, पक्षात दाखल झालेल्या नव्यांचा गट, जुन्या निष्ठावंतांचा गट, अहमदपूरच्या आमदारांचा गट, प्रदेश प्रवक्तांचा गट असे अनेक गटतट लातूरकरांनी पाहिलेले आहेत.

लातूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळणार यावरच सध्या मंथन होत आहे. विद्यमान खासदार सुनिल गायकवाड यांना पालकमंत्री गटाचा विरोध आहे. पालकमंत्री गटाच्या वतीने विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांचे उमेदवारीसाठी नाव पुढे रेटले जात आहे. मागील कांही महिण्यांपासून जिल्ह्यात त्यांचा पक्षखर्च सुरू असल्याचे सर्वजण जाणतात.

उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांचे नावही उमेदवारीसाठी पुढे रेटण्याचे काम काहीजण करीत आहेत. मात्र त्यांचा रस लोकसभेत नाही तर विधानसभेत असल्याचे म्हटले जाते. पण विद्यमान खासदारांच्या विरोधासाठी म्हणून भालेराव यांचे नाव पुढे रेटण्यात येत आहे.

उदगीर तालूक्यातील मौजे शेल्हाळ येथील डॉ. अनिल कांबळे यांनी मागील निवडणुकीत पक्षाचा डमी अर्ज भरलेला होता. यावेळी त्यांनीही आपली दावेदारी ठोकलेली आहे. सध्या ते भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीमध्ये आहेत. संघाची जवळीक असणारे म्हणून ही त्यांची ओळख आहे. या शिवाय इतरही कांही नावे पुढे रेटण्यात येत आहेत.

विद्यमान खासदार सुनिल गायकवाड हे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या गोटातून आपली उमेदवारी राखू शकतील असेही कांही सांगत आहेत. पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या गावात जाऊन ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराचे वाभाडे काढण्याचे काम खासदार सुनिल गायकवाड यांनी केले होते. तर रस्त्याच्या कामावरुनही त्यांनी आपला रोष तर प्रगट केला होताच. पण पालकमंत्री विरोधकांच्या व्यासपीठावर त्यांच्या मतदारसंघातच जाण्याचे धाडसही दाखवले होते.

मुख्यमंत्री स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार समर्थक आणि पालकमंत्री समर्थक तर थेट लातूर महानगर पालिकेत भिडलेले होते. महापौरांना बोलावलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकून गटबाजी असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडे उजनीचे पाणी अभिमन्यू पवार यांनी मागणी केली. त्याच व्यासपीठावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी उजनीच्या पाण्याची गरज नाही असे वक्तव्य केले होते. किल्लारी येथील साखर कारखान्याच्या प्रकरणातही विरोधाभासाची वक्तव्ये दिली गेली आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गटबाजीचा परिणाम दिसून येईल असे म्हटले जात आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी सुनिल गायकवाड परत राखणार की त्यांच्या विरोधासाठी म्हणून डॉ.अनिल कांबळे अथवा सुधाकर शृंगारे यांचे पारडे सर्वजण उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.