
>>अभय मिरजकर
जिल्ह्यात वेळ अमावस्या हा आता केवळ शेतकऱ्यांसाठीच महत्वाचा सण राहिलेला नाही. तर जिल्ह्यातील सर्वांनाच या दिवसाचे वेध लागलेले असतात. आज शहर आणि गावे जणू कांही संचारबंदी लागल्याप्रमाणे ओस पडलेली दिसून येत होती. तर गावागावातील शेत शिवार मात्र माणसांनी फुलून गेलेला दिसून येत होता. मिळेल त्या वाहनांमधून शिवार गाठण्याची धडपड करताना सर्व जण दिसून येत होते.
मुळ कर्नाटकातील असणारा महाराष्ट्रातील धाराशीव व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. सकाळी लवकर शेतात जाण्याची घाई सर्वांना लागलेली दिसून येत होती. शेतातील एखाद्या झाडाच्या जवळ कडब्याच्या पेंड्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतातील पांडवांची पूजा केली जाते. त्यासाठी शेतात पेरण्यात आलेल्या सर्व पिकांचीही पूजा केली जाते. प्रत्येक भागात पूजा करण्याची पद्धतीमध्ये ही थोडेफार वेगळेपण जाणवतेच. घरुन निघताना आंबील एका माठामध्ये भरुन ती चप्पल न घालता गावातील ग्रामदैवतास नैवेद्य दाखऊन शेतात आणली जाते. ज्वारीचे आणि बाजरीचे उंडे, बाजरीची तीळ लावलेली भाकरी, आंबट भात, सर्व प्रकारच्या भाज्यांपासून तयार केलेली भज्जी, गव्हाची खीर, धपाटे, तिळाच्या पोळ्या, चपाती असे विविध प्रकारचे मेनू जेवणात असतात. एक प्रकारचे हे वनभोजन प्रत्येकजण आपापल्यापरीने उत्कृष्ट आणि वेगळे कसे होईल याकडे अधिक लक्ष देऊन करत असलेले दिसून येते.
ज्यांना शेतच नाही त्यांना आजच्या दिवसाचे खास निमंत्रण दिलेले असते. शेत शिवाराच्या आसपासच्या सर्व शेतमालकांना, शेतावरील सालगडी, काम करणारे यांना जेवण्यासाठीचे आग्रहाचे निमंत्रण ठरलेले असते. शहरातील लोकांना हे वन भोजन म्हणजे एक पर्वणीच असते. शेतात लक्ष्मीची पूजा करुन हे वर्ष भरभरुन पिकू दे, इडा, पिडा टळू दे अशी प्रार्थना शेतकरी कुटुंबिय करतात.
सायंकाळी घराकडे परत येण्यापूर्वी शेतात दूध तापवले जाते आणि ते ऊतू आल्यानंतर त्यावरुन पुढील अंदाज बांधण्यात येतात. कांही गावांमधून आजच्या दिवशी हेंडगे पेटवण्याची पण प्रथा आहे. शेतातून सायंकाळी घरी परत येत असताना सोबत एक कडब्याची पेंडी आणली जाते. ती पेंडी पेटऊन गावातील मारुतीच्या मंदिरास प्रदक्षिणा करण्यात येते.