आईनेच स्वत:च्या चोरट्या मुलास पोलिसांच्या ताब्यात दिले

1

सामना प्रतिनिधी । लातूर

लहान मुलीच्या गळयातील सोन्याचे पान चोरणाऱ्या स्वतःच्या मुलास आईनेच पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना रेणापूर तालूक्यातील मौजे पानगाव येथे घडली.

या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात सिंधूबाई प्रल्हाद सोमवंशी ( 62) रा. शिवाजीनगर पानगाव यांनी तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या नातीचे लग्न 28 एप्रिल रोजी आहे. यामुळे लग्नाच्या खरेदीसाठी त्या लातूरला गेल्या होत्या. फिर्यादी सिंधूबाई ह्या घरात स्वयंपाक करीत होत्या. त्यावेळी लहान मुलगी रडल्याचा आवाज आला. बाहेर येऊन पाहिले असता फिर्यादीचा मुलगा किशोर प्रल्हाद सोमवंशी याने लहान मुलीच्या गळयातील दोन ग्रॅमचे सोन्याचे पान दाताने तोडून घरातून पळून गेला. गावातील दत्तात्रय चव्हाण यांना सोबत घेऊन फिर्यादीने मुलाचा शोध घेतला असता तो सापडला. सोन्याच्या पानासंदर्भात विचारणा केली असता मी ते पान चोरलेले आहे. ते मी परत देणार नाही असे म्हटले. त्याला पकडून पानगाव येथील पोलीस चौकीतील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आईच्या फिर्यादीवरुन मुलाविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.