जलयुक्तच्या कामांमुळे भूजल पातळीत वाढ

6

सामना प्रतिनिधी। लातूर

जलयुक्त शिवाराच्या कामांमुळे लातूर जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी ३.५ ते ५ मीटरपर्यंत वाढली आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस जरी पडला तरी पुढील पाच वर्ष टंचाई उद्भवणार नाही व पाण्याच्या टँकरचीही गरज भासणार नाही. जिल्ह्यात शंभर टक्के जलसंधारणाची कामे पूर्ण झाली तर लातूर जलयुक्त होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

जलयुक्त शिवार अभियान मृद व जलसंधारण विभाग, भारतीय जैन संघटना यांच्या सामंजस्य कराराप्रमाणे जलसंधारण कामे अंमलबजावणी आयोजित लातूर आणि रेणापूर तालूक्याच्या कार्यशाळेनिमित्त ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ.सुनिल गायकवाड, आमदार त्र्यंबक भिसे, लातूरचे तहसिलदार संजय वारकड व रेणापूरचे तहसिलदा लटपटे यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री म्हणाले की, साधारणतः अशा प्रकारच्या बैठका व कार्यशाळा मार्च आणि एप्रिल महिन्यात घेण्यात येतात. पण शांततेच्या काळात युध्दाची तयारी करण्याप्रमाणे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यापासूनच दुष्काळाच्या संकटाला पराजित करण्यासाठी या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात गेली दोन वर्षे प्रशासन आणि जनतेच्या सहभागाने जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. तथापि काही गावांमध्ये जलसंधारणाची कामे अपूर्ण असल्यामुळे लातूर जिल्ह्याला कायमचा दुष्काळमुक्त करण्याच्या अनुषंगाने शासनाला आपल्या सहकार्याची पुन्हा एकदा गरज आहे म्हणून नव्या जोमाने या अभियानाला पूर्णत्वास आणण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या