लातूर जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई

1

सामना प्रतिनिधी । लातूर

यावर्षी जिल्ह्यातील पाण्याची समस्या तीव्र स्वरुप धारण करत आहे. मात्र प्रशासन पाणी समस्येकडे गांर्भीयाने लक्ष देत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

लातूर जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई सुरू झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात पाण्यासाठी ओरड सुरू आहे .परंतु प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. लातूर जिल्ह्यात अधिक टँकर लागलेले नाहीत. यामध्ये प्रशासन खुश आहे व टँकरची मागणी पूर्ण केली जात नाही. अनेक गावांमधून टँकरची मागणी वाढत असताना केवळ अधिगृहणावरच भागवण्यात येत आहे.

पाण्याच्या कारणांवरुन गावागावात भांडण तंटे होत आहेत. नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक गावात पाण्यासाठी रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तीन महिन्यांचा कालावधी अजून कसा जाणार याची चिंता लातूर जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावत आहे. लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटना या प्रश्नाकडे अजूनही गांभीर्याने पाहण्यास तयार नाहीत. पाण्यासाठी बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा सवाल आता केला जात आहे.

लातूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या केवळ नागरिकांनाच आहे असे नाही तर जनावरांना, पशुपालकांना अधिक भेडसावत आहे. केवळ मोजक्यात तलावात पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील गाव तलाव तर केव्हाच आटलेले आहेत. काही लघू तलावात, मध्यम प्रकल्पात पाणी साठा उपलब्ध आहे मात्र बहुतांश तलाव कोरडे पडलेले आहेत. जिल्ह्यात भले टँकरची संख्या वाढली तरी चालेल परंतु नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे ती जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी असे म्हटले जात आहे.