गेवराईत जमिनीतून बाहेर पडतोय लाव्हारसा सारखा पदार्थ, ग्रामस्थांमध्ये घबराट

120

सामना प्रतिनिधी । गेवराई

गेवराई तालुक्यातील पोखरी येथे बुधवारी रात्री उशीरा जमिनीतून काळा रासायनिक पदार्थ बाहेर येत असल्याचे दिसले. हा पदार्थ उकळत्या लाव्हारसा सारखा दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

गेवराई तालुक्यातील पोखरी येथे मधुकर मोघे यांच्या शेतात उकळत्या रसायनासारखा काळा द्रव निघत असल्याचे बुधवारी रात्री ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. हा द्रव लाव्हारस तर नाही ना? अशी चर्चा होत आहे. हा प्रकार गेवराई तालुक्यातील पोखरी येथे बुधवारी रात्री उशीरा निदर्शनास आला. त्यानंतर हि बातमी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. याबाबत तहसील प्रशासनाला माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पोखरी येथे जाऊन पाहणी केली आहे. या दरम्यान हा प्रकार नेमका काय आहे? याबाबत अद्याप दुजोरा मिळाला नसून याची माहिती तहसील प्रशासनाला सरपच बबन मोघे यांनी दिली. यानंतर नायब तहसीलदार प्रल्हाद लोखंडे, मंडळ अधिकारी जे.एस.साळुंके, तलाठी डि. ए. शेळके, ओव्हाळ यांनी भेट दिली असून घटनास्थळाची पाहणी केली आहे. काही दिवसापूर्वीच परळी तालुक्यात देखील असाच प्रकार निदर्शनास आला होता.

जाणकारांची माहिती
पोखरी येथील मधुकर मोघे यांच्या शेतात मादळमोही येथील 33 केव्ही केंद्रातून मेन लाईन गेलेली आहे. दरम्यान या ठिकाणी लोखंडी खांब असून यालगतच हा काळा उकळता द्रव निघत आहे. त्यामुळे मेन लाईनचा विद्युत प्रवाह या पोलमध्ये उतरुन एखादा दगड वितळला असल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या