कायदा-सुव्यवस्थेला रोहिंग्यामुळे धोका, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची माहिती

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

रोहिंग्या मुस्लिम देशात कायम राहिल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितले. अशा परिस्थितीत नागरिकांचे रक्षण कोण करणार असा सवालही त्यांनी विचारला आहे.

रोहिंग्या मुस्लिमांच्या समस्येबाबत बुधवारी अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. देशाच्या सुरक्षेचा विचार करता रोहिंग्या मुस्लिमांना कायमस्वरूपी देशात ठेवता येणार नाही असे ते म्हणाले. हिंदुस्थानात सुमारे ४० हजार रोहिंग्या मुस्लिम असून बेकायदा राहणाऱ्या रोहिंग्यांना परत पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. जम्मू, हरयाणा, हैदराबाद,नवी दिल्ली, जयपूर, चेन्नई या राज्यांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे.

रोहिंग्या मुस्लिमांवर कारवाई करणार!

देशात ४० हजार रोहिंग्या मुस्लिम बेकायदा राहत असून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. या रोहिंग्या मुस्लिमांपासून जम्मू-कश्मीरच्या सुरक्षेला धोका आहे. दहशतवादाशी झुंजणाऱ्या कश्मीर खोऱ्याच्या सुरक्षेशी कोणताही समझोता करण्यात येणार नाही. त्यामुळे देशात बेकायदा राहणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांवर कारवाई करण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम असल्याचे ते म्हणाले.