पोलिसाला न्यायालय परिसरात वकिलाची धक्काबुक्की

सामना ऑनलाईन, नांदेड

किनवट शहरातील एका शाळेच्या प्राध्यापिका असलेल्या सुरेखा राठोड यांचा खून झाला होता. या प्रकरणातील एका आरोपीच्या वकिलाने पोलिसाला धक्काबुक्की केली आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. इनायतअली अब्दुल रहेमान देशमुख असं या वकिलाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पतीच्या अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरत असल्याने सुरेखा राठोड यांना ठार मारण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा पती विजय राठोड याला अटक केली आहे. त्याचे ज्या महिलेशी संबंध होते ती महिला देखील या प्रकरणातील आरोपी आहे. ही महिला गुरुवारी नांदेडच्या न्यायालयात येणार असल्याचं किनवट पोलिसांना कळालं होतं. पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे यासाठी न्यायालयात गेले होते. यावेळी इनायतअली आणि आगलावे यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. या बाचाबाची दरम्यान इनायतअली याने आगलावे यांना धक्काबुक्की केली. आगलावे यांनी या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारे इनायतअली याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.