‘3 इडियट्स’मध्ये धार मारलेली ‘रँचो वॉल’ पाडण्याचा शाळेचा निर्णय


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा सुपरहिट ‘3 इडियट्स’ हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध झोतात आलेल्या लेह-लडाख येथील द्रुक पद्मा कारपो स्कूलने ‘रँचो वॉल’ पाडण्याचा निर्णय घेतला आहे. हा वॉल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे मुलांचे लक्ष भरकटत आहे असा दावा शाळा प्रशासनाने केला आहे. यानंतर हा निर्णय घेतला आहे.

‘3 इडियट्स’ या चित्रपटामध्ये या स्कूलच्या भिंतीवर एक दृश्य चित्रित करण्यात आलेले आहेत. यात ‘चतुर’ नावाची भूमिका साकारणारा कलाकार या भिंतीवर सू-सू करतो आणि स्कूलमधील मुलांच्या एका स्वदेशी तंत्रज्ञानामुळे त्याला विजेचा करंट बसतो. हे दृश्य चांगलेच लोकप्रिय झाले होते. यानंतर शाळा प्रशासनाने या भिंतीवर ‘रँचो वॉल’ नावाने पेंटिंग साकारली.

लडाखमध्ये असणाऱ्या स्कूलमधील हे एक प्रेक्षणिय स्थळ बनले आहे. येथे आलेला पर्यटक या भिंतीसमोर फोटो काढल्यावाचून परत जात नाही. परंतु येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे मुलांचे लक्ष भरकटत असल्याचे शाळा प्रशासनाने म्हटले आहे. तसेच पर्यटक परिसरात अस्वच्छता पसरवत असल्याचा दावाही शाळा प्रशासनाने केला आहे.