भाजी बरोबरच घराघरातून आपूलकीचा निर्मळ स्तोत्र पोहचविणाऱ्या शांताबाई

सामना ऑनलाईन । संगमेश्वर   (जे . डी . पराडकर याजकडून ) 

ऋणानुबंध जुळायचे असले, तर ते नात्यांच्या बंधनाशिवाय आपुलकी आणि मायेतूनही जुळून येतात. माणसाच्या डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर असली तर, त्याला जग जिंकता येतं असं म्हटलं जातं. हे अनेकांच्या अनुभवाचे बोल असतात . आपली मृदू वाणी कठोर हृदय देखिल लिलया जिंकू शकते.  प्रसंग आल्यावर खचून न जाता धैर्यानं तोंड देत , जवळपास ४० वर्षांपेक्षा अधिक काळ भाजीचा व्यवसाय अत्यंत प्रामाणिकपणे करुन देवरुखच्या घराघरात आजीचं स्थान प्राप्त करणाऱ्या शांताबाई लाले या ८४ वर्षे वयाच्या आजीच्या जिद्दीची कहाणी काही औरच आहे. भाजी घेतल्यावर प्रत्येक ग्राहकाला आलं , मिरची – कोथींबीर मोफत देण्याच्या व्रतात आजवर एक दिवसही खाडा झालेला नाही हे शांताबाईंच्या यशस्वी भाजी व्यवसायाचं खरं गमक आहे. देवरुखच्या घराघरात भाजी बरोबरच आपुलकीच्या झऱ्याचा निर्मळ स्त्रोत पोहचविणारी शांता आजी पांढरी भाजीवाली म्हणून ओळखली जाते .

शिक्षण नसलं तरी अनुभवाच्या जोरावर स्वतःचा उदरनिर्वाह करता येतो फक्त त्याला कष्टाची जोड हवी ! असा आगळा संदेश शांताबाईंनी आपल्या भाजी व्यवसायातून दिला आहे . जवळपास ४५ वर्षे देवरुख येथील जोशीबंधूंच्या दुकानाजवळ शांताबाई आपला भाजी व्यवसाय करत आहेत . तीनही ऋतूत एकाच जागी बसून सचोटीने भाजी व्यवसाय करणाऱ्या शांताबाईंचा नवरा लग्न झाल्यावरअल्पावधीतच गेला . आपण कोणावरही ओझं बनून राहायचं नाही असं ठरवून त्या सासरहून माहेरी म्हणजेच शाहूवाडी तालुक्यातील कडव येथे आपल्या भावाकडे येवून राहील्या . भावाकडे काही काळ वास्तव्य केल्यानंतर आपण स्वतःच्या पायावर उभे राहीले पाहिजे या एकाच जिद्दीने त्यांना अस्वस्थ केले .

शिक्षण नाही , हाती पैसाही नाही अशातच अकाली वैधव्य आलेलं या स्थितीत व्यवसायासाठी पैसा उभारणार कसा ? या चिंतेतून विचारमंथन करत असताना त्यांना भाजी व्यवसायाची कल्पना सुचली आणि यासाठी त्यांनी तडक देवरुखचा रस्ता धरला . गेली ४५ वर्षे अनेक पावसाळ्यात अनुभवांचे ओलावे घेत घेत शांताबाई आज वयाच्या ८४ व्या वर्षी आपण आनंदी , सुखी – समाधानी असल्याचं सांगतायत . शांताबाईंचा नेहमी हसतमुख असणारा चेहराच त्यांच्या समाधानी जगण्याची प्रचिती देतो . शांताबाईंकडे पाहिल्यावर आनंद हा मानण्यात असतो याची प्रचिती येते .

शांताबाई नानू लाले यांचे देवरुखच्या कै. केशव जोशी यांच्या घराण्याजवळ गतजन्मीचे ऋणानुबंध असावेत . जोशीबंधूंच्या घरीच आंघोळीपासून आपल्या सुखदुख:च्या गप्पा मारे पर्यंत शांताबाईंनी घरोबा केलाय . भाजीच्या गाडीवर कधी डबा आला नाही तर , हक्कानं जोशीबंधूंच्या घरी भाजी भाकरी शांताबाईंसाठी ठेवली जाते . रंगानं तांबूस – गोरी असणारी आजी रंगामुळे पांढरी आजी म्हणून ओळखली जावू लागली यामुळे तिचं खरं नांव फारसं कोणाला ज्ञात नाही . आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचं स्वागत हसतमुखानं केल्यावर त्याच्याजवळ आपुलकीच्या दोन गोष्टी बोलण्याचा नेम आजवर कधी चुकला नाही . याचबरोबर थोडी जरी भाजी घेतली तरी , थोडं आलं , कोथींबीर व मिरची मोफत देण्याचा दुसरा नेमही कधी चुकला नाही . शांताबाईंनी भाजी व्यवसाय असूनही कधी आलं , मिरची – कोथींबीर विकलीच नाही . ती मोफत देण्याचा आनंद त्या आजवर घेत आल्या . खरं तर आलं , मिरची – कोथींबीर हेच त्यांच्या यशस्वी भाजी व्यवसायाचं खरं गमक आहे असंच म्हणावं लागेल.

वयोमानाने शांताबाईंच्या अंगावर पडलेल्या सुरकुत्या या जणू अनुभवांच्या रेषाच आहेत असं म्हणावं लागेल . भाजी देताना त्यासोबत आपल्या निर्मळ मनाच्या मायेचा झरा ग्राहकासोबत नकळत दिल्याने आज देवरुखवासियांजवळ शांताबाईंचं अतूट नातं निर्माण झालंय . गावी त्यांचा नातू गवंडी काम करतो . काही निमित्ताने गावी जाणं होत असलं तरी , ते एक दोन दिवसांसाठीच .सचोटीने व्यवसाय करीत गाठी चार पैसे जोडणाऱ्या शांताबाईंनी गावी बोअरवेलसाठी आपल्या कडील एक लाख रुपये दिले . पाण्यासारखा धर्म नाही हाच संदेश त्यांनी यातून दिला असंच म्हणावं लागेल .  देवरुखातील प्रत्येकाला शांताबाई , आपली आजी वाटावी असं मायेच्या निर्मळ झऱ्याचं नितळ नातं निर्माण करणाऱ्या आजीचं मन तिच्या रंगाप्रमाणं खरंच गोरं आणि तजेलदार आहे यात शंका नाही.