हातमाग

नमिता वारणकर, [email protected]

हातमाग म्हणजे जाडं भरडं… पण आज फॅशन जगतात हातमागाचे ग्लॅमर मोठे आहे.

हातमाग…पारंपरिक, पुरातन कला. त्यावर नक्षीकाम केलेल्या अनेक विविधरंगी, कलाकृतींच्या साडय़ा, ड्रेस, टॉप्स, पलाझो, ओढण्या असे खादीचे नवनवीन पेहराव, भरतकाम केलेल्या पर्सेस, लीननच्या अनेक प्रकारांतील पारंपरिक, आकर्षक मऊसूत साडय़ा कशा दिसतील हे प्रत्यक्ष आजमावून पाहायचे असेल तर उज्ज्वल सामंत या मराठी उद्योजिकेच्या स्टुडिओला भेट द्यायलाच हवी. ‘उज्ज्वल तारा’ हा हातमागावरील कपडय़ांचा ब्रॅण्ड त्यांनी नुकताच सुरू केला आहे. तरुणींसह सगळ्याच वयाच्या महिलांना त्यांना हव्या असलेल्या साडय़ा, ड्रेसेस यामध्ये त्यांचे सौंदर्य कसे खुलते हे अनुभवता येते. हातामागावरील विविधढंगी कपडय़ांच्या या जगात ग्राहकांचा खादीविषयी असलेला गैरसमज नक्कीच दूर होईल.

लोकांना हिंदुस्थानचं हातमागावरील कौशल्य कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासाठी एक स्टुडिओ तयार करावा हा विचार मनात घोळू लागला. या कल्पनेतून ‘उज्ज्वल तारा’ या बॅण्डचा जन्म झाला. आज काळाची गरज बदललीय. तरुण मुली, स्वतःला तरुण समजणाऱया स्त्रियांना स्टायलिश दिसण्यासाठी एक वेगळा लूक हवा असतो. याकरिता पश्चिम बंगाल, गुजरात, कश्मीर ते कन्याकुमारी  अशा सर्वच प्रांतांतील हातमागावरचे पेहराव या बॅण्डअंतर्गत उपलब्ध करून देण्याची इच्छा त्या व्यक्त करतात.

 हातमागाचे कापड म्हणजे जाडंभरडं. त्यात काही सौंदर्य नाही. पारंपरिकता जपण्यासाठी महागडय़ा पैठणी साडय़ा महिला विकत घेतात. मात्र या साडय़ा कमी किमतीतही उपलब्ध आहेत हा सर्वसामान्यांमधला गैरसमज दूर होण्याची आज गरज आहे. यासाठी तळागाळातल्या कारागीरांमध्येही याबाबत जागृती व्हायला हवी. हातमागाचे कपडे म्हणजे त्यात काही सौंदर्य नाही. प्रत्यक्षात या कपडय़ांच्या डिझायनरने तयार केलेले कपडे घातले की महिला भारावून जातात. ‘उज्ज्वल तारा’ या ब्रॅण्डअंतर्गत अनेक हातमागाच्या व्यावसायिकांना आणि कारागीरांना प्रसिद्धी देण्याचा त्यांचा मानस आहे. शिवाय एक फॅशन डिझायनर म्हणून स्वतःचे उत्पादनही या ब्रॅण्डद्वारे उपलब्ध करण्याचे त्यांनी ठरवले आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरामध्ये खादीचं वेगळेपण पोहोचायला हवं असं उज्ज्वल सामंत यांना वाटतं.

कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्याची वेगळी कला आहे. प्रत्येक ठिकाणी कपडय़ांचा वेगळा पोत आणि दर्जा आहे. हातमाग ही मोगलांच्याही आधीपासून अस्तित्वात असलेली कला आहे. त्यावरची कलाकुसर करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जाते. तेव्हा त्या कपडय़ाचं सौंदर्य आपण अनुभवतो. अशा कारागीरांच्या मेहनतीला दाद देणं म्हणजे आपल्या देशाला आर्थिकदृष्टय़ा संपन्न करणं आहे. तरच या कलाकारांनाही त्यांच्या श्रमाचं मोल मिळेल. त्यांची कुटुंबेही आर्थिकदृष्टय़ा सक्षम होतील. याकरिता ही कला जिवंत ठेवण्याची गरज आहे.

थंडीत उबदार आणि उन्हाळ्यात गार वाटण्यासाठी लिनन हे कापड उपयुक्त आहे. लिनन वर्षभर वापरता येतं. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धागे वापरले जातात. जेणेकरून आधुनिक काळासाठी त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव निर्माण करता येतात. मॉडेलिंग आणि सिने जगतात लिनन प्राधान्याने वापरलं जातं. काजोल, विद्या बालन लिननच्या साडय़ा वापरतात. प्लेन लिनन, जरी लिनन तसेच शर्ट, ड्रेस मटेरियल, टॉप्स, स्ट्रेट पॅण्ट असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग यामध्ये सुरू आहेत. शर्ट पॅण्ट आणि जीन्स यापेक्षा एक वेगळ्या आणि पारंपरिक सौंदर्य देणाऱया लिननकडे तरुणाईही आकर्षित होत आहे.