आयर्लंडचे पंतप्रधान, कोकणचे सुपुत्र

4

हिंदुस्थानी वंशाचे डॉ. लिओ वराडकर हे आयर्लंड या देशाच्या पंतप्रधानपदी नुकतेच विराजमान झाले. डॉ. लिओ यांचे वडील डॉ. अशोक वराडकर हे मूळचे कोकणच्या मालवणचे. ते कसे व कधी इंग्लंडला गेले, त्यांनी आपली व आपल्या मुलांची कशी प्रगती केली यावर प्रकाश टाकला आहे जगभर साहसी भ्रमंती करणारे ज्येष्ठ लेखक प्रवीण कारखानीस यांनी…

इंग्लंडच्या उत्तरेला असलेल्या आयर्लंड या देशाच्या पंतप्रधानपदी हिंदुस्थानी वंशाच्या एका मराठी-मालवणी भाषक डॉक्टरांचे सुपुत्र डॉ. लिओ वराडकर यांची झालेली निवड मराठी मनाला नक्कीच आनंद देणारी घटना आहे! आयर्लंड हा शीत कटिबंधातला तद्दन गोऱ्यांचा देश! लोकसंख्या ५० लाख. त्यात आशियाई अवघे ४० हजार. हिंदू १०-१२ हजार, मुस्लीम २०-२२ हजार आणि शीख धर्मीय २-५ हजार! देशातली ९८ ते ९९ टक्के प्रजा ख्रिस्ती धर्माचे पालन करणारी! पूर्वी या देशाचे चलन होते आयरिश पौंड ज्याला ‘पंट‘ ( Punt ) असेही म्हणत असत. तथापि हा देश युरोपियन युनियनचा सभासद झाल्यापासून या देशात ‘युरो’ चलनात आहे. या देशाशी हिंदुस्थानचे संबंध पूर्वीपासूनचे आहेत.

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाचे योगदान दिलेल्या अॅनी बेझंट या ब्रिटनमध्ये जन्मल्या असल्या तरी त्यांचे आई-वडील आयरिश होते. स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या भगिनी निवेदिता, ज्यांचे मूळ नाव मार्गारेट नोबेल असे होते. त्या मूळच्या याच आयर्लंडच्या टायरॉन परगण्यातल्या होत्या. पुढे त्या परगण्यासह संपूर्ण ‘उत्तर आयर्लंड‘चा भूप्रदेश युनायटेड किंग्डमचा एक भाग झाला आणि त्याची राजधानी झाली ‘बेलफास्ट’! मूळ आयर्लंडची राजधानी पूर्वीपासूनच ‘डब्लिन’ आहे! ‘गलिव्हर्स ट्रव्हल्स’ लिहिणारा जोनाथन स्विफ्ट, ‘ड्रॉक्युला’चा लेखक ब्रम स्टोकर, ‘द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे’ या कादंबरीचा निर्माता ऑस्कर वाइल्ड आणि ‘पिग्मलियन’चा लेखक, ‘नोबेल’ पुरस्काराप्रमाणेच ‘ऑस्कर’ पुरस्कारप्राप्त जॉर्ज बर्नार्ड शॉ हा आयरिश होता. साहित्याचा ‘नोबेल’ पुरस्कार मिळविणारे सॅम्युएल बेकर आणि डब्ल्यू. बी. यीटस् हेदेखील आयर्लंडमध्येच जन्मले-वाढले होते. अशा या आयर्लंड देशाचे पंतप्रधानपद चक्क हिंदुस्थानात जन्मलेल्या, शिकलेल्या आणि नंतर इंग्लंडला जाऊन कालांतराने आयर्लंडचे नागरिकत्व घेतलेल्या एका मराठी माणसाच्या सुपुत्राने प्राप्त करावे ही घटना खरोखर अनन्यसाधारण आहे!

हिंदुस्थानसारख्या आशियाई देशातल्या एका हिंदू धर्मीय पित्याचा पुत्र जवळजवळ ९९ टक्के गौरवर्णी ख्रिश्चनधर्मीय लोकसंख्येच्या युरोपीय देशाचा पंतप्रधान म्हणून निवडून येतो आणि तेही वयाची चाळिशीदेखील गाठलेली नसताना. ही गोष्ट आपणा सर्वांना थक्क करणारी तर आहेच, परंतु ती तिथल्या समस्त जनतेच्या उदार मनोवृत्तीची आणि व्यापक दृष्टिकोनाची निदर्शक आहे. लिओ हे स्वतः जरी ख्रिश्चन मातेपोटी जन्मले असले आणि जन्मापासून ख्रिश्चन धर्मच पाळत असले तरी त्यांचे जन्मदाते वडील हिंदू आहेत ही गोष्ट जाहीर असूनही त्यांच्या या निवडीआड आली नाही हे विशेषच म्हणायला हवे! त्यांचे पिताश्री डॉ. अशोक वराडकर हे मूळचे मालवणजवळच्या ‘वराड’ या गावचे असले तरी तसे ते मुंबईकरच होते! सुरत जिह्यातल्या बारडोली गावाजवळदेखील ‘वराड’ याच नावाचे एक खेडे असल्याने काहीजणांनी ते गुजराती असल्याचा समज करून घेतला होता. जो सपशेल चुकीचा आहे हे स्पष्ट करणे मला गरजेचे वाटते. १९६० साली डॉ. अशोक वराडकर इंग्लंडला गेले आणि तिथल्या सरकारी स्वास्थ्य सेवेत एक डॉक्टर म्हणून रुजू झाले.

बर्कशायर परगण्यातल्या स्लाव्ह या गावी त्यांचे आणि तिथल्या एनएचएसच्या रुग्णालयात नर्स म्हणून सेवारत असलेल्या मिरियम नावाच्या आयरिश मुलीचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि एका स्थानिक चर्चमध्ये जाऊन ते एकमेकांशी विवाहबद्ध झाले. डॉ. अशोक यांनी स्वतः ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला नसला तरी या विवाहसंबंधांमुळे भविष्यकाळात होणाऱ्या त्यांच्या अपत्यांचा धर्म ख्रिश्चन असण्याला त्यांनी संमती दर्शविली. इंग्लंडमध्ये लेस्टर शहरी राहत असताना त्याना ‘सोफिया’ नावाची मुलगी झाली. त्यानंतर ते सर्वजण आयर्लंडला कायमचे निघून गेले. डॉ. अशोक यांनी तिथे आपला दवाखाना थाटला. ‘सोनिया’ नावाचे आणखी एक कन्यारत्न त्याना प्राप्त झाले. त्यानंतर ‘लिओ’ चा जन्म झाला. तो दिवस होता १८ जानेवारी १९७९. या मुलाचे पाय पाळण्यातच दिसू लागले. ‘वडिलांप्रमाणे मी डॉक्टर तर होणारच, परंतु एक दिवस मी या देशाचा आरोग्यमंत्री होऊन दाखवीन’ असे हा लिओ अवघ्या सात- आठ वर्षांचा असल्यापासून आपल्या मित्रमैत्रिणींना सांगू लागला.

डब्लिन येथील ट्रिनिटी कॉलेजमधून प्रथम कायद्याची पदवी घेऊन नंतर त्याने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश केला. तिथे शिकत असतानाच तो स्थानिक ‘कौंटी कौन्सिल’वर नगरसेवक म्हणून निवडून आला आणि दोन वर्षांनी तर तो आयर्लंडच्या पार्लमेंटवर प्रचंड बहुमताने निवडून आला. त्याही काळात त्याने वैद्यकशास्त्रातले आपले महाविद्यालयीन शिक्षण चालूच ठेवले. ते त्याने खंडित होऊ दिले नाही. यथावकाश तो डॉक्टर झाला. काही महिने त्याने मुंबईला येऊन केईएम रुग्णालयात इंटर्नशिप केली असेही माझ्या ऐकिवात आहे. पुढे तो पर्यटन, दळणवळण आणि क्रीडा खात्याचा केंद्रीय मंत्री झाला. क्रीडामंत्री या नात्याने तो आयर्लंडच्या क्रिकेट संघाबरोबर तो हिंदुस्थानात येऊन गेला. ती खाती तो सांभाळत असतानाच्या काळात सलमान खान-कतरिना कैफ ही जोडी असलेला ‘एक था टायगर’ या हिंदी चित्रपटासाठी निर्मात्यांनी आयर्लंडमधील ‘डब्लिन’ या शहरात चित्रीकरण करण्याची परवानगी मागितली तेव्हा लिओ वराडकर यांनी नगर प्रशासनाच्या विविध खातेप्रमुखांशी समन्वय साधत तशी परवानगी देण्याची व्यवस्था केली.

त्या चित्रीकरणामुळे हिंदुस्थानी निर्मात्यांकडून आयर्लंडच्या सरकारी तिजोरीत या ना त्या प्रकारे हजारो युरो तर जमा झालेच, शिवाय डब्लिन शहरातल्या हॉटेल आणि अन्य अनेक व्यावसायिकांचीही चांदी झाली! मुहूर्ताच्या एका ‘शॉट’ साठी लिओ वराडकर हे स्वतः जातीने उपस्थित होते. तथापि, त्यांच्या अवतीभवती असलेल्यांना ते या देशाचे एक दिवस पंतप्रधान होतील याची पुसटशी कल्पनादेखील तेव्हा आली नसेल! डॉ. वराडकर यांनी बालपणापासून उराशी बाळगलेले आरोग्यमंत्री व्हायचे स्वप्नदेखील एके दिवशी पूर्ण झाले. आरोग्यमंत्री असतानाच्या काळात पार्लमेंटमध्ये समलिंगी विवाहांना मान्यता देण्याचा कायदा संमत करून घेण्यापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर आपले रोखठोक विचार व्यक्त करीत असताना त्यांनी आपण स्वतः ‘गे’ (Gay) असल्याची जाहीर कबुली दिली आणि सर्वांना आश्चर्याचा जबरदस्त धक्का दिला.

तरीही त्यांची लोकप्रियता यत्किंचितही कमी झाली नाही. गेल्या एक-दीड वर्षापासून ते आयर्लंडची सामाजिक सुरक्षा व्यवस्था पाहत होते. आयर्लंडच्या पार्लमेंटमध्ये ‘Fine Gael’ हा पक्ष सत्तेत आहे तर ‘Fianna Fail’ हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आणि देशाचे पंतप्रधान एण्डा केनी यांनी १७ मे २०१७ रोजी पदत्याग केल्याने अचानक रिक्त झालेल्या त्या पदांवर डॉ. लिओ वराडकर यांनी आपला दावा ठोकला आणि त्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक लढविली. तिचा निकाल लागला आणि डॉ. वराडकर पक्षप्रमुख म्हणून विजयी घोषित झाले. या देशाच्या घटनेनुसार पंतप्रधानपदाची सूत्रेदेखील त्यांच्याच हाती आली. अशा रीतीने वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे भाग्य त्यांना लाभले असून ते सर्वात कमी वयाचे पंतप्रधान आहेत.

लिओ वराडकर यांना दोन मोठ्या बहिणी असून ‘सोफिया’ ही न्यूरॉलॉजिस्ट आहे. ती प्रायः लंडनला असते. दुसरी ‘सोनिया’ ही परिचारिका-नर्स म्हणून डब्लिनमध्येच काम करते. लिओ वराडकर यांना मालवणी, मराठी, हिंदी बोलता येत नाही. हिंदुस्थानातील त्यांचे सर्वात मोठे काका डॉ. अशोक वराडकर यांचे ज्येष्ठ बंधू स्वर्गस्थ मधुकर वराडकर हे मालवण तालुक्यातले थोर समाजसेवक होते. वराड गावचे ते अनेक वर्षे सरपंच होते. दुसरे काका मनोहर वराडकर हे स्वातंत्र्यसैनिक असून आज ९३ वर्षांचे आहेत. त्याना शिरीष नावाचा पुत्र असून शुभदा नावाची कन्या आहे. शुभदा ही ओडिसी नृत्यात पारंगत असून तिचे देशविदेशात कार्यक्रम होत असतात. डब्लिनला गेली असताना ती आपले चुलत बंधू लिओ वराडकर यांच्याकडे राहून आली आहे. लिओ यांना हिंदुस्थानी खाद्यसंस्कृतीबद्दल कुतूहल असून गुलाबजाम हा त्यांचा आवडता पदार्थ आहे असे तिला दिसून आले आहे. असो. एकेकाळी मराठी मातीत जन्मलेले बलदंड राजकीय नेते एक ‘वराडकर’ हे हिंदुस्थानचे पंतप्रधान होण्याची शक्यता निर्माण झाली होती, परंतु मराठी माणसांच्या दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यामुळे निदान आज एका मराठी पित्याचे कर्तृत्ववान सुपुत्र एक ‘वराडकर’ हे सुदूरच्या आयर्लंडचे पंतप्रधान झाले आहेत याचा साहजिकच आनंद आणि अभिमान मराठी मनाला वाटत असला तर त्यात गैर ते काय!

[email protected]