राहुरीत सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्या जेरबंद

75

सामना प्रतिनिधी, राहुरी

राहुरी तालुक्यातील मोमीण आखाडा येथील दोघा ग्रामस्थांवर हल्ला करून कडवळाच्या पिकामध्ये घुसलेल्या बिबट्याला सहा तासाच्या प्रयत्नांनंतर भूलीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आले. बिबट्या जेरबंद होताच घटनास्थळी हजर असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.

राहुरी शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोमीन आखाडा येथील बाबासाहेब बाळासाहेब शिंदे या शेतकऱ्याच्या शेती गट क्रमांक 91 मध्ये मंगळवारी सकाळी 9 वाजता बिबट हल्ल्याची ही खळबळजनक घटना घडली. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात रितेश कदम (25), भाऊसाहेब माळी (60) राहणार मोमीन आखाडा राहुरी हे जखमी झाले आहेत. रितेश कदम गंभीर जखमी असल्याने त्यांना पुणे येथे तर भाऊसाहेब माळी यांना नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या हल्ल्यानंतर बिबट्या जवळच असलेल्या कडवळ चाऱ्याच्या पिकात घुसल्याचे रामनाथ शिंदे या शेतकऱ्याने पाहिले.या घटनेची खबर मिळताच शेतीत मशागतीची कामे सोडून शेकडो शेतकरी तसेच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते.

बाबासाहेब शिंदे यांनी वनविभागाला या घटनेची खबर दिली. खबर मिळताच वनविभागाचे वनपाल सचिन गायकवाड,वनपाल जी.एन.लोंढे,संगमनेर येथील वनरक्षक के.जे.पुंड,वनरक्षक एस.एम.पारधी,राहुरीचे पोलीस कॉन्सटेबल संजय जाधव,वन कर्मचारी यु.बी.खराडे, यु.जी.किनकर, रामनाथ वाबळे, गोरख मोरे, बबन वायळ, भाऊसाहेब गाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्यास जेरबंद करण्याचे ऑपरेशन सुरू केले. दरम्यान बाहेर लोकांचा जमाव असल्याचा सुगावा लागल्याने कडवळाच्या पिकामध्ये दबा धरून बसण्याचे काम बिबट्याने केले. कडवळ पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले मात्र ते व्यर्थ ठरल्याने पशु वैद्यकीय तज्ञास घटनास्थळी पाचारण करण्यात आले.दबा धरून बसलेल्या बिबट्याला दुपारी 3 वाजता भूलीचे इंजेक्शन देऊन शांत करण्यात आले. बिबट्याला गुंगी येताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी ग्रामस्थाच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्यात कैद केले.

या बिबट्याला राहुरीतील डिग्रस नर्सरीत हलविण्यात आले आहे. डिग्रस येथे दोन दिवसाच्या मुक्कामानंतर बिबट्याला नैसर्गिक अदिवासात मुक्त केले जाणार आहे. पाणी, भक्ष्य तसेच सुरक्षित रहिवासाची सोय असल्याने राहुरीच्या मुळा व प्रवरा नदीच्या पट्ट्यात बिबट्यांची संख्या मोठी आहे.दरम्यान गेल्या २ महिन्यापासुन पाण्याचे दुर्भिक्ष जाणवु लागल्याने बिबट्यांनी आपला मोर्चा नागरी वस्त्यांकडे वळविला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या