देवळा परिसरात बिबटय़ाची दहशत

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नाशिक

देवळा परिसरातील खर्डा खोऱ्यातील इखाऱ्या डोंगर परिसरात बिबटय़ांचा संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. परिसरात पिंजरे लावण्याची मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.

खर्डा खोऱ्यातील शेरी, वार्शी, हनुमंतपाडा, घोडय़ाची अढी, कनकापूर, कांचणे परिसरात डोंगर व दाट जंगल असल्याने त्यालगतच्या शेतजमिनींमध्ये सतत बिबटय़ाचा वावर असतो. काही दिवसांपासून परिसरातील गायी व बकऱ्यांवर त्याने हल्ले चढविल्याच्या घटना घडल्या आहेत. रात्री पिकाला पाणी देण्यासाठी जाताना ग्रामस्थांनाही बिबटय़ाचे दर्शन झाल्याने ते धास्तावले आहेत. परिसरात तीन-चार बिबटे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, या भागात मादी व तिची पिल्ले असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे.

या भागात त्वरीत पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी शेरीचे उपसरपंच नंदकुमार जाधव, जयराम पवार, गोरख गांगुर्डे, रमेश सोनवणे, हिरामण जाधव, शिवाजी पवार, गोरख जाधव, नंदू पवार, दिनकर पवार, गोरख बच्छाव, मिराबाई बर्डे यांनी केली आहे. सध्या लखमापूर परिसरात दहा ते पंधरा पिंजरे लावण्यात आले असल्याने पिंजरे उपलब्ध नाहीत. मात्र, परिसरात वनरक्षक, वनपाल, तसेच वनमजूर यांनी गस्त घालून बिबटय़ाचा वावर असल्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला असून, लवकरच पिंजरे उपलब्ध होतील, अशी माहिती वनविभागाने दिली आहे.