भय इथले संपत नाही, बिबट्याने घेतले सहा बळी

सामना प्रतिनिधी । चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. बुधवारी दुपारी शेतात कापूस वेचणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला आहे. गायत्री सुरेश पाटील (३८) असे महिलेचे नाव असून उपचारासाठी तिला चाळीसगाव रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बिबट्याने गेल्या काही दिवसांत सहा जणांचा बळी घेतला आहे, तर चार जणांना गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे ’भय इथले संपत नाही’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी शार्प शूटर बोलावण्यात आले आहे.

उपखेड शिवारातील एका शेतामध्ये गायत्री पाटील आणि इतर लोकं कापूस वेचत होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायत्री यांच्यावर हल्ला केला. लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. बिबट्याने त्यांच्या मानेवर पंजा मारल्याने जखम झाली. त्यानंतर जखमी महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी, बंदोबस्तासाठी तैनात असलेले अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

चाळीसगाव तालुक्यात बिबट्याने आतापर्यंत सहा जणांचा बळी घेतला आहे. हल्ला करून चार जणांना गंभीर जखमी केले आहे. या सोबत गाय, घोडा, शेळी यासह अनेक प्राण्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.