मॉडरेटर्सच्या मानधनातून वाहतूक भत्ताच गायब

प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मॉडरेटर्सना दहावीच्या पेपर तपासणीचे मानधन मिळाले खरे, पण या मानधनातून वाहतूक भत्ताच गायब आहे. शिक्षकांना मिळालेल्या मानधनात वाहतूक भत्ता म्हणून शिक्षण मंडळाकडून देण्यात येणाऱया १५० रुपयांचा समावेशच नसल्याची तक्रार शिक्षकांनी केली आहे.

दहावी, बारावीचे पेपर तपासणाऱया मॉडरेटर्सना अतिशय तुटपुंजे मानधन मिळते. गेल्यावर्षी या शिक्षकांनी मानधनवाढीसाठी केलेल्या आंदोलनानंतर मानधनात एक रुपया वाढ करण्यात आली. यंदा शिक्षकांना वाढीव मानधन  मिळाले, पण या मानधनात वाहतूक भत्त्याचाच समावेश केलेला नाही. टीचर्स डोमोक्रॅटिक फ्रंटचे राजेश पांड्या यांनी सांगितले, ‘शिक्षण मंडळाकडे आम्ही वाहतूक भत्ता वाढवून देण्याची मागणी केली होती. पण यंदा मंडळाने कहरच केला.

वाहतूक भत्ता वाढविण्याऐवजी तो मानधनातून गायबच केला.’ मॉडरेटर्सच्या मानधनातून गायब झालेल्या वाहतूक भत्त्याविषयी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाला काहीच माहिती नसून याबाबत माहिती घेणार असल्याचे मंडळातील अधिकाऱयांनी सांगितले.