निवृत्तीचे धोनीलाच ठरवूद्या, सचिनकडूनही माहीची पाठराखण

सामना प्रतिनिधी, मुंबई

महेंद्रसिंग धोनीने कधी निवृत्ती घ्यायची ते त्याला स्वतःलाच ठरवूद्या. तो निर्णय आपण त्याच्यावरच सोडायला हवा. एखादा खेळाडू प्रदीर्घ काळ मैदानात राहिल्यावर क्रिकेटशौकिनांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत? याची जाण त्या खेळाडूलाच चांगली असते. त्याने कधी निवृत्ती स्वीकारायची याचा निर्णय आपण त्याच्यावरच सोडलेला बरा, अशा शब्दांत मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने माही धोनीची पाठराखण केली आहे.

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सचिनने धोनीची पाठराखण केली आहे. सचिन म्हणाला, धोनी हा अनुभवी खेळाडू आहे. कालानुरूप आपला खेळ कसा आहे आणि तो कसा असावा हे धोनी चांगलेच जाणतो. त्याचा पूर्वाश्रमीचा सहकारी खेळाडू म्हणून मला विश्वास आहे की, योग्य वेळ येताच माही आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती नक्कीच जाहीर करील, असेही सचिनने सांगितले.

सचिनवरही आला होता निवृत्तीसाठी दबाव
धोनीप्रमाणेच सचिनच्या कारकीर्दीतही त्याच्यावर निवृत्तीचा दबाव वाढलेला होता. अनेक टीकाकार, माजी खेळाडू यांनी सचिनला क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला सांगितली होती. मात्र २०१३ साली मुंबईच्या वानखेडे मैदानात वेस्ट इंडीज विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळत सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. रवी शास्त्राr यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. आता दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरही महेंद्रसिंह धोनीच्या मदतीला धावून आला आहे. आता सचिननेच धोनीला आपला पाठिंबा दर्शवल्यानंतर धोनीच्या निवृत्तीबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागतो का हे पाहणं रंजक ठरणार आहे.

धोनी हा अनुभवी खेळाडू आहे. कालानुरूप आपला खेळ कसा आहे आणि तो कसा असावा हे धोनी चांगलेच जाणतो. माही आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती नक्कीच जाहीर करील,
– सचिन तेंडुलकर