हिंदुस्थानातील भाकितामुळे पाकडे टरकले, ‘हाय अलर्ट’ जारी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आणि काही वेबसाईटवर या वर्षाच्या अखेरपर्यंत हिंदुस्थानासह एकूण ११ राष्ट्रांना भूकंप आणि ‘सीशम’ नावाच्या चक्रीवादळाचा तडाखा बसणार अशी पोस्ट आणि वृत्त प्रसारित करण्यात आले होते. बाबू कालीयल नावाच्या व्यक्तीने हा अंदाज वर्तवला असून त्याने बी. के. रिसर्च असोसिएशन फॉर ई.एस.पी या संस्थेच्या लेटरहेडवर पंतप्रधानांना हा अंदाज पत्राद्वारे कळवला होता.

व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या अनेक चुका असलेल्या या पत्रामध्ये ३१ डिसेंबर २०१७ पूर्वी हिंदुस्थानासह एकूण ११ देशांना भूकंपाचा धक्का बसेल, चक्रीवादळामुळे ताशी १२० ते १८० प्रतिकिलोमीटर वेगाने वारे वाहतील, असे म्हणण्यात आले होते.

या पत्राला हिंदुस्थानात तेवढे महत्त्व दिले नाही मात्र, या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्राने पाकिस्तानची झोप उडल्याचे दिसत आहे. बाबू कालीयल याने हिंदुस्थान, पाकिस्तान, चीनसह इतर ११ देशांना त्सुमानी, चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचे भाकित केले होते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बाबू कालीयलचे हे भाकित गांभीर्याने घेतले असून संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

भूकंप पुनर्रचना आणि पुनर्वसन प्राधिकरणाने काढलेले पत्र सोशल मीडियावर प्रसारित केले गेले, ज्यात अधिकारी आणि संबंधित विभागांना त्वरित कार्यप्रणालीचा पाठपुरावा करण्याची सूचना देण्यात आली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाकडून आयएसआयचे महासंचालक यांना पत्र लिहून या मोठ्या भूकंपामुळे त्सुनामीची शक्यता वर्तवत सावधतेचा इशारा दिला आहे.

पाकिस्तानातील इंटर सर्व्हिसेज इंटेलिजन्सकडून आयएसएआय आलेल्या माहिती अहवालात मोठ्या प्रमाणात भूकंपाची शक्यता असल्याचे वर्तवण्यात आले आहे. नजीकच्या काळात हिंदी महासागरात वादळ येण्यासंबंधी संबंधित विभागांना अशा नैसर्गिक आपत्तीची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

भूकंप आणि त्सुनामीचे भविष्य वर्तवण्याकरिता शास्त्रज्ञ तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न करत आहेत. उपलब्ध तंत्रज्ञानाच्या आधारे भविष्यवाणी करता येत नसल्याने भूकंप ही सर्वात मोठी आपत्ती मानली जाते. जपानी आणि अमेरिकन लोकांनी याकरता लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.