तुरुंगातून ४०० कैदी पळाले, देशात आणीबाणी जाहीर

सामना ऑनलाईन। लिबिया

लिबियातील दक्षिण तिरपोली ऐन जारा तुरुंगातून ४०० कैदी पळाले असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. यामुळे लिबिया सरकारने देशात आणीबाणी जारी केली आहे. सध्या लिबियात दोन हत्यारबंद गटांमध्ये संघर्ष उफाळला आहे. हे दोन्ही गट रस्त्यावर उतरले असून रक्तरंजित वाद सुरू आहे. याचाच गैरफायदा घेत कैदी तुरुंगाचे दरवाजे तोडून पळाल्याचे दक्षिण तिरपोली ऐन जारा तुरुंग प्रशासनाने सांगितले आहे.

तुरुंगातून पळालेल्या कैद्यांमधील सर्वधिक कैदी लिबियाचा माजी हुकुमशाह मुअम्मर गद्दाफीचे समर्थक आहेत. गद्दाफीला २०११ साली नाटो समर्थकांनी सत्तेतून बाहेर केले होते. त्यानंतर विरोधकांनी गद्दाफीची हत्या केली होती. तर हजारो गद्दाफी समर्थकांना तुरुंगात टाकले होते. लिबियात गेल्या आठ दिवसांपासून सेवेंथ ब्रिगेड आणि तिरपोली रिवोल्युशनरिज या दोन गटात वाद उफाळला आहे. शनिवारी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, आणि इटली या देशांनी एकत्रितपणे येत हा संघर्ष संपवण्याचे आवाहन लिबियाला केले आहे. लिबियातील या संघर्षात आठ दिवसात ३९ नागरिक ठार झाले असून शेकडो जण जखमी झाले आहे. यादरम्यान प्रस्थापितांसाठी उभारण्यात आलेल्या छावण्यांवरही रॉकेट हल्ला करण्यात आला आहे.

summary-libiya-400-prisioner-run-from-prison