निवडणूक काळात मद्य विक्री केली, 15 हॉटेल्स आणि दुकानांचे परवाने कायमचे रद्द

90

सामना ऑनलाईन, धुळे

लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रतिबंध असतानाही मद्य विक्री करणाऱ्या 15 हॉटेल्स आणि दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानंतर उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. मद्य विक्रीचा परवाना असणाऱ्यांनी नियमांचे पालन करीत व्यवसाय करावा नाही तर 50 हजार रुपयांचा दंड वसूल होईल, असा इशारा यावेळी उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. दरम्यान, धुळे तालुक्यातील चौगाव येथे शनिवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाने छापा घालून हातभट्टीची दारू निर्माण करणाऱ्यांवर ही कारवाई केली.

लोकसभा निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मद्यविक्रीसाठी काही दिवस प्रतिबंध घालण्यात आला होता. पण तरीही जिह्यातील काही हॉटेल्स आणि दुकानदारांनी दारू विक्री केल्याचे उघड झाले. उत्पादन शुल्क विभागाने त्यावेळी अचानक कारवाई केली. प्रतिबंध असतानाही दारू विक्री केली म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिह्यातील 15 परवाने कायमस्वरूपी रद्द केले. त्यानंतरच्या काळात जर प्रतिबंध असताना दारू विक्री केल्याचे उघड झाले तर किमान 50 हजार रुपयांचा दंड होईल, असे देखील कळविण्यात आले.

आचारसंहिता संपल्यानंतरदेखील बनावट दारू रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. धुळे तालुक्यातील चौगाव येथे हातभट्टीची दारू तयार करून ती विकली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. भरारी पथकाने चौगाव येथे जाऊन पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांना सोबत घेऊन कारवाई केली. या कारवाईनंतर गावातील प्रमोद बागले आणि आबा हालोर या दोघा तरुणांना संजय ठाकरे, अशोक ठाकरे, रमेश ठाकरे, विनोद भिल, सुकदेव मोरे, निंबा अहिरे, पिंटू माळीच यांनी बेदम मारहाण केली.हातभट्टीच्या दारूविषयी माहिती देऊन कारवाई करावयास लावली असा संशय मारहाण करणाऱ्यांना आहे. प्रत्यक्षात आमचा काही संबंध नाही. आम्हाला मारहाण करणाऱ्यांवर गंभीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जखमी झालेले प्रमोद बागल आणि आबा हालोर यांनी केली आहे.

यांचे परवाने कायमचे रद्द

मुकटी येथील हॉटेल आनंद, मोहाडी उपनगरातील हॉटेल राजपॅलेस, हॉटेल पूनम, धुळे शहरातील चैनी रोडवरील हॉटेल बावर्ची, धुळे तालुक्यातील विंचूर येथील हॉटेल गौरव, नेर येथील परवानाधारक ज्योती कपूर, रतनपुरा येथील परवानाधारक यशवंत चौधरी, बोरकुंड येथील रवींद्र भदाणे, करवंद येथील चंद्रकांत अग्रवाल, पळासनेर येथील संजय जयस्वाल,शिरपूर तालुक्यातील शेमल्या पाडा येथील संजय जयस्वाल, भिरडाणे येथील सूर्योदय बिअर शॉपी, चैनी रोडवरील कनूप्रसाद जयस्वाल, मुकटी येथील प्रताप चौधरी, मोहाडी उपनगरातील विक्रमसिंह कदमबांडे यांच्या नावे असलेले दारू दुकानाचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या