आभाळमाया/वैश्विक -आम्लाचा पाऊस पडला आणि…

 ‘ज्युरॅसिक पार्क’ नावाच्या चित्रपटाने सगळ्या जगाचं डायनॉसॉरविषयीचं कुतूहल जागं केलं. वैश्विक घटनांचा वेध घेताना आपल्याला आपल्या पायाखाली असलेल्या एकमेव ग्रहाचा विसर पडून चालणार नाही. पृथ्वीवरची जीवसृष्टी अनेकदा नैसर्गिक आणि अंतराळी आपत्तींमुळे धोक्यात आली आहे. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरच्या जवळपास प्रत्येक खंडात डायनॉसॉर नावाच्या महाकाय प्राण्यांचं साम्राज्य होतं. एकपेशीय जीवापासून वाढत गेलेल्या पृथ्वीवरच्या सजीवाची उक्रांती तोपर्यंत डायनॉसॉर या अक्राळविक्राळ प्राण्यापर्यंत झाली होती. त्याची प्रतीकं चीनसारख्या देशात ड्रगनच्या रूपाने दिसतात.

प्रत्यक्षात ड्रगन किंवा डायनॉसॉर कोणीच पाहिलेला नाही. कारण या महाकाय प्राण्यांचा समूळ विनाश झाल्यावरच विविध आकारांचे इतर प्राणी विकसित झाले. त्यानंतरच केव्हातरी होमोसेपियन या माणसाच्या पूर्वजाची प्रजात जन्माला आली आणि नैसर्गिक परिस्थितीशी कधी जुळवून घेत कधी त्यावर मात करत अथवा त्यात अनुकूल बदल करत माणसाने सर्व प्राण्यांवर आपली सत्ता प्रस्थापित केली. डायनॉसॉर अस्तित्वात होते तेव्हा घोडय़ांसारख्या प्राण्यांचा आकारही खूप छोटा होता असं म्हणतात.

जगात सर्वत्र पसरलेली घनदाट जंगले आणि त्यात या डायनॉसॉरचा अनिर्बंध वावर कोटय़वधी वर्षे सुरू होता आणि एक दिवस अचानक विपरीत घडलं. अवकाशात इतस्ततः फिरणारा एक महाकाय अशनी पृथ्वीवर आदळला. त्याने अवघ्या पृथ्वीवर हाहाकार उडवला. सारी धरणी डळमळली आणि त्यात डायनॉसॉर प्रजातीचा पूर्णपणे अंत ओढवला.

अशनीचा आघात, त्यातून निर्माण झालेली प्रचंड ऊर्जा असह्य होऊन डायनॉसॉर स्वतःला वाचवू शकले नाहीत. त्यांची संपूर्ण प्रजातीच नष्ट व्हावी इतका तो आघात अकल्पित आणि भीषण होता. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर घडलेल्या या महाउत्पाताविषयीची आणखी नवी माहिती पुढे आली आहे.

जर्मनीमधील पोस्टडॅम येथील संशोधकांनी डायनॉसॉरच्या विनाशाविषयी विशेष अभ्यास केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की, त्या महाकाय अशनीने पृथ्वीला धडक दिल्यानंतर जी विलक्षण वादळं उठली त्याने सारी पृथ्वी भरदिवसाही अंधारली दगडधुळीचे लोटच्या लोट आसमंतात पसरले. इतकंच नव्हे तर ही प्रक्रिया बराच काळ चालल्याने अंधारलेल्या पृथ्वीवर सूर्यप्रकाश पोहोचेनासा झाला. पृथ्वीचं तापमान कमी होऊ लागलं. त्यातच ऑसिडचा पाऊस पडू लागला आणि बऱयाच वनस्पती जळून गेल्या. डायनॉसॉरना जीव जगवणं कठीण झालं.

पृथ्वीवरची ही अंधारयात्रा आणि आम्लाचा पाऊस याचं चक्र शेकडो वर्षे सुरू राहिलं. एकूणच जीवसृष्टीच्या दृष्टीने तो काळ कठीण होता. ‘महापुरे झाडे जाती, तेथ लव्हाळे वाचती’ या न्यायानुसार डायनॉसॉर नावाचे मोठे प्राणी तग धरू शकले नाहीत.

पण डायनॉसॉर नष्ट झाले आणि त्यानंतरच सस्तन प्राण्यांचा हळूहळू पृथ्वीवर विकास झाला. मॅमल्स आणि पुढे मानवी प्रजात असा हा प्रवास. मरणात खरोखर जग जगते याची ही अतिप्राचीन साक्ष. डायनॉसॉर संपले आणि पृथ्वीवर नवयुगाची सुरुवात झाली. माणसाने अफाट प्रगती केली. जीवाष्मांमध्ये उरली ती डायनॉसॉरची प्रचंड आकाराची अंडी आणि काही सांगाडे. त्याचीच सांगड घालून ज्युरॅसिक पार्कची कल्पना पडद्यावर अवतरली.

अवकाशात पृथ्वीला भेडसावणारे आणखीही अशनी तरंगताहेत. मात्र आता त्यांना आधीच रोखण्याइतकं विज्ञान माणसाने पुढे नेलंय.