6 वर्षांनंतर श्रीसंतला दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने आजीवन बंदी उठवली

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

‘आयपीएल’मधील स्पॉटफिक्सिंग प्रकरणात दोषी सापडल्यामुळे सहा वर्षे क्रिकेटपासून दूर राहणारा आणि शिक्षा भोगत असलेला शांताकुमारन श्रीसंत याला सर्वोच्च न्यायालयाकडून शुक्रवारी दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून त्याच्यावरील आजीवन बंदी उठवण्यात आली. ‘बीसीसीआय’ने या शिक्षेबाबत तीन महिन्यांत पुनर्विचार करून निर्णय द्यावा असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे.

2013 सालामध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत स्पॉटफिक्सिंग केल्याचा आरोप श्रीसंतवर करण्यात आला होता. त्यानंतर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने त्याच्यावर बंदीची कारवाई केली. त्यानंतर श्रीसंतने केरळ उच्च न्यायालयात या कारवाईला आव्हान दिले, पण त्यांनीही बीसीसीआयचा निर्णय कायम ठेवला. यानंतर श्रीसंतने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवण्याचा निर्णय घेतला.

अझरुद्दीनला संधी मिळू शकते तर त्याला का नाही?

‘बीसीसीआय’कडून लादण्यात आलेली बंदी कठोर आहे. बेकायदेशीर गोष्टींमध्ये सहभागी होतो हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही असे श्रीसंतकडून न्यायाधीश अशोक भूषण व के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सांगण्यात आले. तसेच मॅचफिक्सिंगमध्ये दोषी सापडलेल्या मोहम्मद अझरुद्दीनला क्रिकेट प्रशासनमध्ये येण्याची ‘बीसीसीआय’कडून परवानगी देण्यात आली अशी माहिती श्रीसंतचे वकील सलमान खुर्शीद यांनी खंडपीठाला देतानाच श्रीसंतला पुन्हा संधी का नाही, असा सवालही उपस्थित केला.

आता राष्ट्रीय क्रिकेट बोर्डाच्या निर्णयावर लक्ष

‘बीसीसीआय’ तीन महिन्यांत कोणता निर्णय घेतेय यावरही श्रीसंतचे भवितव्य अवलंबून असणार आहे. श्रीसंतला स्कॉटलंडमध्ये क्रिकेट खेळावयाचे आहे, मात्र आजीवन बंदी उठवली असली तरी ‘बीसीसीआय’कडून काही वर्षांची बंदी ठोठावल्यास श्रीसंत पुन्हा मैदानापासून दूर राहू शकतो.

मला लाइफलाइन मिळाली

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे मला मिळालेली ‘लाइफलाइन’च आहे. या निर्णयामुळे मला आशेचा किरण दिसू लागलाय. तीन महिन्यांनंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर असेन, असे भावुक उद्गार श्रीसंतने यावेळी काढले. लिएंडर पेसने वयाच्या 42व्या वर्षी ग्रॅण्डस्लॅम जिंकले, मी 36व्या वर्षी क्रिकेट तरी खेळू शकतो अशी आशा पुढे त्याने व्यक्त केली.