सुमित्रा दळवी खूनप्रकरणी आरोपी मुकेश साटम याला जन्मठेप

4

सामना प्रतिनिधी सिंधुदुर्ग  

देवगड तालुक्यातील वेळगीवे येथील सुमित्रा वामन दळवी यांच्या खूनप्रकरणी आरोपी मुकेश राजू साटम (२५) याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस डी जगमलानी यांनी दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मृत सुमित्रा वामन दळवी (७५) रा. मुटाट पाळेकरवाडी देवगड या फिर्यादी प्रल्हाद सदानंद लाड  रा. वेळगिवे गावठण, देवगड यांच्या आत्या असून त्या आपल्या माहेरी शेतीच काम करण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान फिर्यादी यांचा नातेवाईक मुकेश राजू साटम (२५) रा. नादगावठण, देवगड हाही राहण्यासाठी वेळगिवे देवगड येथे आला होता. दरम्यान २७ जून २०१७ रोजी फिर्यादी यांच्या घरातील सर्वजण शेतात कामासाठी गेली होती. यावेळी घरात सुमित्रा या व मुकेश हे दोघेच होते. दरम्यान सायंकाळी ४ ते ५:३० च्या सुमारास मुकेश यांनी सुमित्रा यांच्या अंगावर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत केली होती. तसेच सुमित्रा यांच्या अंगावर असलेले आणि घरात असलेले १ लाख १६ हजार रूपये एवढ्या किमतीचे सोन्याचे दागिने घेवून पसार झाला होता.

शेतातून घरी आल्यावर सुमित्रा यांच्यावर हल्ला झाल्याचे निदर्शनास आले. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर पुढील उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी येथे पाठविण्यात आले होते. मात्र २८ जून रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी प्रल्हाद लाड यांनी मुकेश याच्या विरोधात २८ जून २०१७ ला विजयदुर्ग पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार मुकेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर २ जुलै २०१७ रोजी मुंबई येथून मुकेशला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्याकडे चोरीला गेलेली सोन्याची नथ सापडली होती.

दरम्यान जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत साक्ष व  वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानत प्रधान  जिल्हा व सत्र न्यायाधीश एस डी जगमलानी यांनी आरोपी मुकेश याला भादवी कलम ३०२ खाली जन्मठेप व १० हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.