दोन सख्ख्या बहिणींच्या नरबळी प्रकरणी अकरा जणांना जन्मठेप

1

सामना ऑनलाईन। नाशिक

भूतबाधा झाल्याच्या संशयावरून आई आणि मावशी यांचा नरबळी दिल्या प्रकरणी दोन भावांसह अकराजणांना मंगळवारी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. स्वतःजवळ पैसे यावेत, कौटुंबीक सुखप्राप्ती व्हावी, यासाठी मोखाडा तालुक्यातील रहिवाशी असलेल्या गोविंदा पुनाजी दोरे, काशीनाथ पुनाजी दोरे या दोघा भावांनी बुधीबाई पुनाजी दोरे व तिची बहीण काशीबाई भिका वीर या दोघींना भूतबाधा झाल्याचे समजून त्यांना अमानुष मारहाण करून त्यांच्या अंगावर नाचून त्यांची हत्या केली होती.

या खटल्याच्या सुनावणीनंतर नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आज बच्चीबाई खडके, हरि निरगुडे, लक्ष्मण निरगुडे, नारायण खडके, वामन निरगुडे, किसन निरगुडे सर्व (रा. टाकेहर्ष, ता. इगतपुरी, जि. नाशिक) गोविंदा दोरे, काशीनाथ दोरे, महादू वीर, बुगीबाई वीर, सतिबाई निरगुडे सर्व (रा. दांडवळ व वाघ्याची वाडी, ता. मोखाडा, जि. ठाणे) या अकराजणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.